
राजस्थानच्या डुंगरपूर येथील एका महिलेचा 18 वर्षापूर्वी विवाह झाला होता. पण नवऱ्याशी जमत नसल्याने ती 12 वर्षापूर्वीच त्याच्यापासून दूर गेली होती. वेगळी राहत होती. मात्र, सहा महिन्यापूर्वी ती अचानक आली. त्यानंतर तिला एक संशय वाटला. आपला नवरा सर्व संपत्ती दिराच्या मुलाच्या नावे करेल की काय असं तिला वाटलं. त्यामुळे दोघांमध्ये सारखा वाद होत होता. घरात भांडणं होत होती. त्यामुळे नवऱ्याने तिला अखेर रागाच्या भरात मारून टाकलं. तीन दिवसानंतर नवऱ्याने स्वत:हून पोलीस ठाण्यात जाऊन स्वत:ला पोलिसांच्या हवाली केलं.
बक्सी डामोर असं या व्यक्तीचं नाव आहे. तो आसेला येथील रहिवाशी आहे. 18 वर्षा पूर्वी त्याचं लग्न बबली डामोरशी झालं होतं. लग्नाच्या दीड वर्षानंतर दोघांमध्ये वादावादी सुरू झाली होती. त्यामुळे दोघांनीही वेगळं राहण्याचा निर्णय घेतला होता. या दरम्यान त्यांना एक मुलगाही झाला.
बबली ही पीहर गलंदर या तिच्या गावी राहत होती. बबली सोडून गेल्यामुळे बक्सीने दुसरं लग्न केलं होतं. पण सहा महिन्यांपूर्वी बबली अचानक परतली. सर्व राग रूसवा सोडून ती आली होती. दोघांनी पुन्हा वाद न करण्याचा निर्णय घेतला आणि एकत्र राहण्याचं ठरवलं. पण आपल्या संपत्तीचा वारसदार दीराचा मुलगा होणार असल्याचा बबलीला संशय होता. आपला नवरा आपल्याला संपत्तीतील एक कवडीही देणार नाही असं तिला वाटत होतं. त्यावरून दोघांमध्ये वारंवार वाद व्हायचे. 16 एप्रिल रोजीही बबलीने आपल्या मुलाला वारसदार बनवावं म्हणून सांगितलं. त्यामुळे त्यावरून त्यांच्यात वाद सुरू झाले.
विहिरीत मृतदेह फेकला
वाद वाढल्याने बबलीने अखेर घर सोडण्याचा निर्णय घेतला. मला माझ्या बहिणीच्या घरी मांडवा नवाघरा येथे सोडून दे असं ती बक्सीला म्हणाली. 17 एप्रिल रोजी बक्सी बबलीला तिच्या बहिणीच्या घरी सोडायला निघाला. पण रस्त्यात पुन्हा दोघांमध्ये त्याच मुद्द्यावरून वाद सुरू झाला. त्यामुळे बक्की प्रचंडच चिडला. त्याने बबलीला जबर मारहाण केली. आणि तिचा गळा दाबून तिची हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह घरापासून 3 किलोमीटर दूर मांडवा खापरडा गावातील एका 50 फूट खोल सुकलेल्या विहिरीत फेकला.
स्वत: शरणागती पत्करली
बबलीची हत्या केल्यानंतर बक्सी घरी आला. त्याने या घटनेची कुणालाही माहिती दिली नाही. पण तीन दिवसानंतर 20 एप्रिल रोजी त्याने स्वत:ला सरेंडर केलं. पत्नीला मारल्याचा पश्चात्ताप झाल्याने त्याने शरणागती पत्करली. त्याने पोलिसांना सर्व हकिकत सांगितल्यानंतर पोलीसही हैराण झाले. त्यानंतर ज्या विहिरीत बायकोचा मृतदेह फेकला होता तिथे त्याला पोलीस घेऊन गेले. त्यानंतर पोलिसांनी विहिरीतून बबलीचा मृतदेह काढला. त्यानंतर त्याला अटक केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहे.