6 लाखांचं डील, मुलीशी लग्न करण्याचं ठरलं, मुलाने 50 हजारही दिले, पण नवरदेवाला लग्नाआधीच खरं समजलं आणि….

तरुणाने नवरीच्या आधारकार्ड संबंधित माहिती इंटरनेटवर ई मित्र वेबसाईटवर टाकली तेव्हा त्याला आश्चर्याचा धक्काच बसला.

6 लाखांचं डील, मुलीशी लग्न करण्याचं ठरलं, मुलाने 50 हजारही दिले, पण नवरदेवाला लग्नाआधीच खरं समजलं आणि....
प्रातिनिधिक फोटो
| Edited By: | Updated on: Aug 01, 2021 | 2:53 PM

जयपूर : काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यात पोलिसांनी सोनू गँगच्या मुसक्या आवळल्या होत्या. ही गँग लग्नाच्या नावाने अनेकांना लुबाडायची. ही गँग एखाद्या तरुणासोबत मुलीचं लग्न ठरवायची. लग्नाच्या निमित्ताने मुलाच्या कुटुंबियांकडून लाखो रुपये घ्यायची. पण लग्न झाल्यानंतर किंवा लग्नाच्या आधी नवरी मुलीसह तिचे नातेवाईक अचानक गायब व्हायचे. त्यांचे फोनही बंद व्हायचे. अशीच एक टोळी राजस्थानमध्ये सक्रिय होती. पण एका तरुणाच्या सतर्कतेमुळे या टोळीच्या मुसक्या आवळण्यात राजस्थान पोलिसांना यश आलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

संबंधित घटना ही राजस्थानच्या सिरोही जिल्ह्यातून समोर आली आहे. रेवदरचा एक तरुण या टोळीच्या जाळ्यात अडकला होता. आरोपी अरविंद ऊर्फ टीना भाईने या तरुणाकडून लग्नासाठी 6 लाख रुपये मागितले होते. विशेष म्हणजे तरुणाने लग्नाच्या आधीच 50 हजार रुपये दिले होते. तरुणाने मध्यस्थीत असलेल्या दलालाकडून लग्ना संबंधित कागदपत्रे तयार करण्यासाठी मुलीचं आधारकार्ड मागितलं होतं. सुरुवातीला आरोपीने आधारकार्ड देण्यास टाळाटाळ केली. पण तरुणाने जेव्हा हट्ट केला तेव्हा आरोपीने मुलीचं फेक आधारकार्ड तरुणाला दिलं.

तरुणाने मुलीच्या आधारकार्ड संबंधित माहिती इंटरनेटवर ई मित्र वेबसाईटवर टाकली तेव्हा त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. कारण संबंधित आधारकार्ड हे दुसऱ्याच कुठल्या मुलीचं होतं. त्यामुळे तरुणाने वेळ न दडवता तातडीने पोलिसांना याबाबत माहिती दिली.

पोलिसांनी कारवाई कशी केली?

तरुणाने पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली. पण तोपर्यंत आरोपींनी धूम ठोकली होती. या दरम्यान मेहसाणा येथे राहणारा आरोपी अरविंद हा ही गँग चालवतो, अशी माहिती पोलिसांना मिळाली. अरविंद हा आदिवासी आणि गरीब मुलींना पैसे देऊन नवरी बनवतो. त्यांचे खोटे आई-वडील लोकांसमोर सादर करतो आणि अनेकांना लुबाडतो, अशी महत्त्वपूर्ण माहिती पोलिसांना मिळाली.

पोलिसांनी सर्वात आधी मुलीचा खोटा बाप बनलेल्या भीखे खान याला बेड्या ठोकल्या. त्याचबरोबर मुलीच्या तीन खोट्या नातेवाईकांनाही अटक केली. या सर्वांना ही गँग प्रत्येकी 10 हजार रुपये देणार होती. पोलीस आता अटकेत असलेल्या आरोपींची विचारपूस करत आहेत.

हेही वाचा : सोनू…तुझ्यावर कुणाचाच भरोसा नाय, 13 लग्न, 13 मुलांना लुटलं, सोनू शिंदेची टोळी अखेर सापडली!