मोठी बातमी ! भारताकडून लष्करी सरावाला सुरूवात, आफ्रिकेतील देशाच्या सैनिकांचाही सहभाग
Indian Army : भारत आणि सेशेल्स यांच्या सैन्यदलांमधील संयुक्त लष्करी सरावाला सुरुवात झाली आहे. भारताच्या तिन्ही सैन्यदलांचा या सरावात सहभाग असणार आहे.

भारत आणि सेशेल्स यांच्या सैन्यदलांमधील संयुक्त लष्करी सराव Exercise Lamitye 2026 9 मार्चपासून सुरू झाला आहे. हा सराव 20 मार्चपर्यंत सेशेल्समध्ये चालणार आहे. या सरावाचा उद्देश दोन्ही देशांच्या सैन्यांमधील समन्वय, सहकार्य आणि संयुक्त लष्करी मोहिमा राबवण्याची क्षमता मजबूत करणे हा आहे. भारताच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार या सरावात भारताच्या तिन्ही सैन्यदलांचा सहभाग असणार आहे. या सरावाबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
तिन्ही सैन्यदलांचा पहिल्यांदाच संयुक्त सहभाग
भारत आणि सेशेल्स यांच्यातील सैन्यदलांमधील संयुक्त लष्करी सरावाला सुरुवात झाली आहे. या सरावाचे खास वैशिष्ट्य म्हणजे प्रथमच भारतीय सैन्य दराच्या तिन्ही दलांनी यामध्ये एकत्रितपणे यात भाग घेतला आहे. भारतीय तुकडीत आसाम रेजिमेंटचे सैनिक सहभागी झाले आहेत. याशिवाय नौदलाची युद्धनौक INS त्रिकंद Trikand आणि वायुदलाचे लॉकहीड C-130 Hercules विमानही या सरावात सहभागी झाले आहेत. भारताचे लष्करी पथक सेशेल्समध्ये पोहोचले असून तेथील सैन्यासोबत प्रशिक्षण घेत आहे.
दर दोन वर्षांनी होणारा सराव
हा सराव सेशेल्स डिफेन्स अकादमीत आयोजित केला जात आहे. हा या संयुक्त लष्करी सरावाची 11 वी आवृत्ती आहे. या सरावाची सुरुवात 2001 साली झाली होती, तेव्हापासून हा सराव नियमितपणे दर दोन वर्षांनी सेशेल्समध्ये आयोजित केला जात आहे. या सरावाला लामितिये असे नाव आहे. लामितिये हा शब्द सेशेल्सच्या क्रिओल भाषेतील असून त्याचा अर्थ मैत्री असा होतो. या सरावाचे नावही याच संकल्पनेचे प्रतीक आहे. दोन्ही देशांच्या सैन्यांमधील मैत्री आणि सहकार्य अधिक मजबूत करणे हे याचे उद्दिष्ट आहे.
सरावादरम्यान दोन्ही देशांचे सैनिक अर्ध शहरी भागांमध्ये होणाऱ्या लष्करी कारवायांशी संबंधित प्रशिक्षण घेतील. तसेच शांतता मोहिमांदरम्यान एकत्र काम करण्याची क्षमता वाढवण्यावरही भर दिला जाईल. या सरावात सैनिक संभाव्य धोक्यांना तोंड देण्यासाठी विविध प्रकारचे सामरिक (टॅक्टिकल) सराव एकत्रितपणे करतील. यात आधुनिक शस्त्रे, नवीन उपकरणे आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराचे प्रशिक्षणही दिले जाणार आहे.
सराव अनेक टप्प्यांमध्ये पार पडणार
हा 12 दिवसांचा सराव अनेक टप्प्यांमध्ये पार पडणार आहे. त्यामध्ये फील्ड ट्रेनिंग एक्सरसाइज, युद्धासंबंधी चर्चा, केस स्टडी, व्याख्याने (लेक्चर्स), प्रत्यक्ष प्रात्यक्षिके यांचा समावेश आहे. या सरावाच्या शेवटी दोन दिवसांची अंतिम चाचणी घेतली जाईल, ज्यामध्ये संपूर्ण प्रशिक्षणाचा आढावा घेतला जाईल. संरक्षण मंत्रालयाच्या मते, या सरावामुळे भारत आणि सेशेल्सच्या सैन्यांमधील परस्पर समज आणि सहकार्य अधिक मजबूत होईल. तसेच दोन्ही देशांमधील लष्करी संबंधही आणखी दृढ होतील. त्यामुळे हा सराव दोन्ही देशांच्या सैनिकांसाठी महत्त्वाचा असणार आहे.
