
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडसह इतर आरोपींना बीड जिल्हा कारागृहात व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचे आरोप गत काही दिवसात केले जात आहेत. आता याच आरोपाबाबत देशमुख कुटुंबाकडून जेल प्रशासनाकडे तक्रार केली जाणार आहे. सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करुन देण्याची मागणी केली जात आहे. कारागृहातील अधिकारी बक्सार मुलाणी आणि कर्मचारी ज्ञानेश्वर डोईफोडे, कृष्णा ढाकणे, सुधाकर मुंडे हे सहकार्य करत असल्याचं म्हटलं जात आहे. या सर्व प्रकाराविषयी आता कारागृह प्रशासनाकडे माहिती अधिकारात सीसीटीव्ही फुटेज मागितले जाणार असल्याचे देशमुख कुटुंबाच्या सदस्यांनी सांगितले आहे. याची दखल न घेतल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याची माहिती देऊन तक्रार केली जाणार आहे.
मागच्या अडीच महिन्यापासून महाराष्ट्रात संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन बरच काही घडलं आहे. संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यात मोर्चे निघाले, आंदोलन झाली. पण अजूनही कुटुंबियांच्या मनासारखा तपास होत नाहीय. या प्रकरणातील आणखी एक आरोपी कुष्णा आंधळे अजूनही फरार आहे. आपल्या सात मागण्यांसाठी मस्साजोगच्या ग्रामस्थांसह संतोष देशमुख यांच्या कुटुंबाने अन्नत्याग आंदोलन सुरु केलं होतं. पण काल हे आंदोलन मागे घेण्यात आलं.
तो खंडणीच्या गुन्ह्यात तुरुंगात बंद
संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. या गुन्ह्यातील सर्व आरोपींवर मकोका कायदा लावण्यात आला आहे. वाल्मिक कराडच या गुन्ह्याचा मास्टरमाइंड असल्याचा आरोप सातत्याने करण्यात आला. तो खंडणीच्या गुन्ह्यात तुरुंगात बंद आहेत. अन्य आरोपींवर संतोष देशमुख यांच्या हत्येचा आरोप आहे. वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून अनेकदा करण्यात आली. सध्या राज्य सरकारने संतोष देशमुख हत्या प्रकरणात उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. या हत्या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. बरेच आरोप-प्रत्यारोप झाले आहेत.