
आई-वडिलांसाठी आपली मुलं सर्वात महत्वाची असतात, त्यांचं त्यांच्यावर जीवापाड प्रेम असतं. मुलांच्या भल्यासाठी, त्यांच्या आनंदासाठी ते काहीही करू शकतात. पण काही आई-वडील असे असतात ज्यांना मुलांच्या आनंदापेक्षा आपली पत, प्रतिष्ठा मोठी वाटू शकते आणि प्रसंगी त्यापायी ते मुलांचा जीवही घेऊ शकतात. ऑनर किलींगच्या अनेक घटना आपण पाहिल्या असतील, बातम्या वाचल्या असतील. सैराटसारख्या चित्रपटातून ते भयानक वास्तव मोठ्या पडद्यावरही दाखवण्यात आलं आहे. मात्र अशीच एक ऑनर किलींगची अत्यंत भयानक, हृदयाचा थरकाप उडवणारी घटना जालन्यात घडली आहे. नेमकं काय झालं तिथे ?
प्रेम प्रकरणाच्या संशयावरून जन्मदात्या पित्यानेच पोटच्या अल्पवयीन लेकीचा गळा आवळून खून केला. आणि नंतर ती आत्महत्या असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला. जालन्यातीवल या घटनेमुळे प्रचंड खळबळ माजली असून गावकरीही दहशतीता आहे. पोटच्या लेकीला मारणाऱ्या खुनी पित्याला पोलिसांनी अटक केली असून अधिक तपास सुरू आहे. मात्र यामुळे गावात चांगलेच भीतीचे वातावरण असून सगळीकडे याच खुनाची चर्चा सुरू आहे.
आधी मुलीला संपवलं, मग रचला आत्महत्येचा बनाव
मिळालेल्या माहितीनुसार, जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यात हे हत्याकांड घडले. प्रेम प्रकरणाच्या संशयावरून जन्मदात्यानेच आपल्या पोटच्या अल्पवयीने लेकीचा गळा आवळून खून केला. बदनापूर तालुक्यातील दावलवाडी येथील ही संतापजनक घटना घडली असून पित्याने आधी मुलीचा गळा दाबून खून केला. मात्र त्यानंतर त्याने घरात असलेल्या लोखंडी अँगलवर तिचा मृतदेह लटकावला आणि आपल्या मुलीने आत्महत्या केली असल्याचा बनाव केला.
मात्र,मुलीचा आकस्मिक मृत्यू झाल्यानंतर पोलिसांचा संशय अधिक बळावल्याने पोलिसांनी या प्रकरणात सखोल तपास करायला सुरुवात केली. तेव्हा हे सर्व धागेद्वारे समोर आले आणि बापाला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपणच पोटच्या लेकीचा खून केल्याचे कबूल केले, त्यामुळे हे धक्कादायक वास्तव तपासात समोर आलं. मुलीच्या प्रेमसंबंधामुळे समाजात अपमान होईल या भीतीने वडिलांनी त्यांच्या मुलीचा गळा दाबून खून केला, अशी प्राथमिक माहिती देखील समोर येत आहे. याप्रकरणी आरोपी वडील हरी बाबुराव जोगदंड याला पोलिसांनी तात्काळ अटक केली असून बदनापूर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. दरम्यान शवविच्छेदन अहवालात देखील गळा दाबल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.