Nashik | अंबड औद्योगिक वसाहतीत भीषण अपघात, शेड तोडून ट्रक थेट शेतात; चालकाचा जागीच मृत्यू

अंबड औद्योगिक वसाहतीत भीषण अपघात घडलाय. एक आयशर ट्रक शेड तोडून थेट शेतात घुसला आहे. या घटनेत ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला.

Nashik | अंबड औद्योगिक वसाहतीत भीषण अपघात, शेड तोडून ट्रक थेट शेतात; चालकाचा जागीच मृत्यू
अंबड औद्योगिक वसाहतीत झालेल्या अपघातात ट्रक चालक जागीच ठार झाला.
| Edited By: | Updated on: Dec 08, 2021 | 6:02 PM

नाशिकः नाशिक जिल्ह्यातल्या अंबड औद्योगिक वसाहतीत भीषण अपघात झालाय. एक आयशर ट्रक शेड तोडून थेट शेतात घुसला आहे. या घटनेत ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला. राहुल राम इकबाल असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याचे समजते.

कसा घडला अपघात?

नाशिकच्या अंबड औद्योगिक वसाहतीत एक्स-लो पॉईंट येथे हा अपघात घडला. सकाळी सहाच्या सुमारास एक आयशर ट्रक (एम.एच. 15 सी. टी. 1822) हा गरवारे पॉईंटकडून एक्स-लो पॉईंटच्या दिशेने येत होता. मात्र, एक्स-लो पॉईंटजवळ आल्यानंतर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रक थेट रस्त्याकडील शेडमध्ये घुसला. या धडकेने पत्र्याचे शेड कोसळले. ट्रकची पुढची काच फुटून चालक अर्धा बाहेर आला. अपघात इतका भीषण होता की, ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला. राहुल राम इकबाल (वय 30, रा. दत्त नगर, चुंचाळे, नाशिक) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वीची आठवण ताजी

येवला-मनमाड रोडवर काही दिवसांपूर्वी पहाटे असाच भीषण अपघात झाला होता. या अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. येवला-मनमाड रोडवरील अंकाई बारी येथे इर्टिका आणि आयशर या दोन गाड्यांची समोरासमोर धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की, दोन्ही गाड्यांचा चक्काचूर झाला, तर  सहा जणांचा जागीच मृत्यू झाला होता. हे सर्व अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील एकाच कुटुंबातील रहिवासी होते. तर आयशर गाडीचा चालक हा अपघातात बचावला असून त्याने घटनास्थळावरुन पळ काढला.

वेग पाळा, अपघात टाळा

अंबड औद्योगिक वसाहतीत झालेला अपघात वाहन चालकाचे नियंत्रण सुटून झाला. मात्र, या ट्रकचा वेग जास्त असण्याची शक्यता आहे. त्यामुळे एक्स-लो पाईंटजवळ वाहन चालकाचे नियंत्रण सुटले. जिल्ह्यात वेगात वाहन चालवल्यामुळे होणारे अपघात वाढले आहेत. एकट्या नाशिकमध्ये ऑगस्ट महिन्यात नऊ दुचाकीस्वारांचा मृत्यू हा अपघातात झाला आहे. त्यापैकी बहुतांश जण वेगात होते. सोबतच त्यातल्या एकानेही हेल्मेट घातलेले नव्हते. आपल्याला स्वतःचा जीव प्रिय असेल, तर वेगावर नियंत्रण पाळा आणि अपघात टाळा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

इतर बातम्याः

Love of animals| गुंतले प्राण या रानात माझे, आधी वासराला पाजले, गाईची धार काढली, त्यानंतरच नववधूसह गृहप्रवेश; एका निरागस प्रेमाची गोष्ट…!

Nashik | नाशिककरांनो, कोणती प्लास्टीक पिशवी वापरताय; अन्यथा होऊ शकतो 25 हजारांचा दंड, 3 महिने जेलही