
खेमचंद कुमावत, टीव्ही 9 मराठी : जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील तरवाडे बुद्रुक येथे नऊ वर्षांची मुलगी शाळेतून घरी येताना शुक्रवारी ( १२ डिसेंबर ) सायंकाळी रहस्यमयरित्या बेपत्ता झाली होती. ही चिमुरडी बेपत्ता झाल्याने तिच्या घरच्यांनी तिला शोधण्यासाठी आकाशपाताळ एक केले परंतू तिचा काही थांगपत्ता लागत नव्हता. येथील तरवाडे शिवारातील शेत रस्त्यावर तिचे दप्तर काही दिवसांनी सापडल्याने पोलिसांनी आजूबाजूचा परिसर पिंजून काढला. परंतू आज तिचा मृतदेह एका विहिरीत तरंगताना सापडल्याने खळबळ उडाली आहे.
जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील तरवाडे बुद्रुक गावातील इयत्ता चौथीतील नऊ वर्षीय चिमुकली धनश्री शिंदे शाळेतून सायंकाळी नेहमीप्रमाणे घरी येत असताना अचानक बेपत्ता झाली होती.सायंकाळी पाच वाजता या चिमुकलीची शाळा सुटल्यानंतर ती घराकडच्या रस्त्याने चालत निघाली होती.गावातील ग्रामपंचायत जवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात देखील ही चिमुकली कैद झाली होती. मात्र ती घरापर्यंत काही पोहोचलीच नाही. कुटुंबियांनी लागलीच गावात आणि परिसरात तिला शोधण्याचा प्रयत्न केला मात्र ती सापडली नाही. त्यानंतर परिवाराने चाळीसगाव ग्रामीण पोलिसांशी संपर्क साधून त्यांना घटनेची माहिती दिली आणि त्यानंतर धनश्री बेपत्ता झाल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस प्रशासनाने तात्काळ चिमुकलीच्या शोधासाठी आजूबाजूच्या परिसरात पथके रवाना केली. मात्र धनश्री कुठेही पत्ता लागला नव्हता.
ग्रामस्थ आणि पोलीस धनश्रीचा शोध घेत असताना दुसऱ्या दिवशी तरवाडे शिवारातील एका शेत रस्त्यावर तिचे दप्तर सापडले. यानंतर पोलिसांनी तपासाचा वेग आणखीन वाढवला. चौथ्या दिवशी जळगाव एलसीबीची टीम तरवाडे गावात दाखल झाली. चिमुकली शिक्षण घेत असलेल्या जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत पोलिसांनी शिक्षकांची विचारपूस करीत चौकशी केली. तसेच संपूर्ण शेत शिवारात ड्रोनच्या साह्याने तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यातही पोलीस प्रशासनाला अपयश आले.
पाचव्या दिवशी चिमुकलीच्या शोधासाठी गावातील शेत शिवारात पथके रवाना करण्यात आली. आज सकाळी चिमुकलीचा मृतदेह तरवाडे शिवारातील एका शेतातील विहिरीत तरंगताना आढळून आला. ही माहिती परिसरात पसरल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली. फॉरेन्सिक टीमसह, संपूर्ण पोलीस प्रशासन,आणि ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले. चिमुकलीचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठण्यात आला आहे.पोलीस पुढील कारवाई करत असल्याची प्रतिक्रिया अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी दिली आहे.
आमची धनश्री विहिरीत कशी गेली, याचा शोध पोलिसांनी लवकर लावावा आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. तिच्यावर काही अत्याचार करुन नंतर तिला मारुन टाकले का याचा आम्हाला संशय आहे. परंतु शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच खरं कारण कळेल अशी माहिती आम्हाला पोलिसांनी दिली आहे अशी प्रतिक्रिया चिमुकलीच्या नातेवाईकांनी दिली आहे.या चिमुकलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आला असून पुढील प्रक्रिया सुरू आहे. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच चिमुकलीच्या मृत्यूचे गुढ उलघडणार आहे, नऊ वर्षाच्या चिमुकलीचा मृतदेह पाच दिवसानंतर गावाजवळील विहिरीत आढळून आल्याने संपूर्ण पंचक्रोशीत मोठी खळबळ उडाली आहे.