बदलापुरात होलिका दहनाच्या कार्यक्रमात हाणामारी, दोन गटांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल

| Updated on: Mar 08, 2023 | 5:08 PM

होलिका दहन कार्यक्रमात दोन गटात राडा झाल्याची घटना बदलापुरात घडली. तसेच एका महिलेची छेडछाड करण्यात आली. याप्रकरणी बदलापूर पूर्व गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

बदलापुरात होलिका दहनाच्या कार्यक्रमात हाणामारी, दोन गटांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल
शिरगाव परिसरात महिलेची हत्या
Image Credit source: TV9
Follow us on

बदलापूर / निनाद करमरकर : बदलापुरात होलिका दहनाच्या कार्यक्रमाला गालबोट लावणारी घटना उघडकीस आली आहे. कार्यक्रमादरम्यान दोन गटात राडा झाल्याची घटना घडली. याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलिसांनी दोन्ही गटांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत. अॅट्रोसिटी, मारहाण आणि दंगल गुन्ह्यांचा यात समावेश असून, तीन जणांना अटक केली आहे. ज्ञानेश्वर भोसले, बाळा लाड, राजू लाड अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

होलिका दहन कार्यक्रमादरम्यान राडा

बदलापूर पूर्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात सोमवारी रात्री होलिका दहनाचा कार्यक्रम सुरू होता. यावेळी तिथे रोहित धनगर हे त्यांच्या मित्रांसह होळी बघण्यासाठी आले होते. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या ज्ञानेश्वर भोसले, बाळा लाड, राजू लाड यांच्यासह अन्य 10 ते 15 जणांनी त्यांना जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केल्याचा धनगर यांचा आरोप आहे.

महिलेची छेडही काढली

याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनला अॅट्रोसिटी आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर पोलिसांनी ज्ञानेश्वर भोसले, बाळा लाड, राजू लाड यांना अटक केली. तर दुसरीकडे होलिका दहनाचा कार्यक्रम सुरू असताना तिथे उपस्थित एका महिलेची ओढणी ओढत छेड काढण्यात आली आणि त्याचा जाब विचारला असता आर्यन राऊत, आदित्य धनगर, बाळा धनगर याच्यासह इतर 10 ते 15 जणांनी शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा पीडित महिलेचा आरोप आहे.

हे सुद्धा वाचा

याप्रकरणी पोलिसांनी मारहाण आणि दंगलीचा गुन्हा दाखल केला असला, तरी विनयभंगाचा गुन्हा दाखल केलेला नाही. या प्रकरणात अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नसून, आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी दिली. पोलिसांच्या कारवाईकडे बदलापूरकरांचं लक्ष लागलं आहे.