तो फोनवर बोलत राहिला…आणि पत्नीच्या खात्यातून पैसे गायब होत होते, नेमकं काय घडलं ? वाचा

| Updated on: Feb 06, 2023 | 9:47 AM

वर्मा यांना ही बाब नंतर लक्षात आल्यानंतर त्यांनी आपल्या पत्नीसह अंबड पोलीस ठाणे गाठत फिर्याद दिली, त्यावरून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तो फोनवर बोलत राहिला...आणि पत्नीच्या खात्यातून पैसे गायब होत होते, नेमकं काय घडलं ? वाचा
ऑनलाईन टास्कच्या नावाखाली फसवणूक
Image Credit source: Google
Follow us on

नाशिक : बँकेचे अधिकारी किंवा क्रेडिट कार्ड (Credit Card) देतो म्हणून फोन आल्यानंतर आपली वैयक्तिक माहिती देऊ नका असं सायबर पोलीस (Cyber Police) सांगून अनेक जण माहिती देतात आणि ऑनलाईन फसवणुकीचे बळी होतात. विशेष म्हणजे आपल्या आजूबाजूला ऑनलाईन फसवणुकीच्या (Online Fraud) घटना घडत असतांना त्यातून धडा घेण्याऐवजी सर्रासपणे अनेकजण माहिती देऊन मोकळे होतात, आणि नंतर बँकेतून पैसे गेल्याने सायबर पोलिसांत जाऊन पैसे परत मिळवून देण्याची विनवणी करत असतात. असं चित्र अलिकडच्या काळात मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. मात्र, नुकतीच नाशिकमधील एक ऑनलाईन फसवणुकीचा प्रकार चर्चेचा विषय ठरत आहे.

नाशिकच्या सिडको परिसरात राहणाऱ्या सुनीलकुमार वर्मा यांना बजाज फायनान्स मधून बोलत असल्याचा फोन आला होता. प्रीतम झा आणि जावेद नावाच्या दोन व्यक्तींचे वेगवेगळ्या नंबर वरुन फोन आले होते.

यावेळी योजनांची माहिती देत असल्याचे सांगत अधिकाऱ्यांनी वर्मा यांना गुंतवून ठेवले होते. त्याचवेळी तुमचे काही कर्ज आहे का? त्याचीही माहिती द्या म्हणून वर्मा यांना सांगितले, वर्मा यांनी लागलीच विश्वास ठेवत माहिती दिली.

हे सुद्धा वाचा

यामध्ये सुनील कुमार वर्मा यांनी आपल्या पत्नीच्या खात्याची माहिती दिली. त्याचवेळी मोबाइलच्या माध्यमातून समोरील ऑनलाईन भामटयांनी वर्मा यांच्या पत्नीच्या खात्यातील 56 हजार रुपयांची रक्कम लांबविली.

वर्मा यांना ही बाब नंतर लक्षात आल्यानंतर त्यांनी आपल्या पत्नीसह अंबड पोलीस ठाणे गाठत फिर्याद दिली, त्यावरून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ऑनलाईन भामटयांनी बँक खात्याची गोपनीय माहिती मिळवून ऑनलाईन फसवणूक केली आहे. वर्मा यांच्या चुकीमुळे पत्नीच्या खात्यातून 56 हजार 310 रुपये इतकी रक्कम लांबविली आहे.

याशिवाय वर्मा यांच्या खात्यातील रक्कमेचा यामध्ये समावेश आहे. सायबर पोलीस एकीकडे ऑनलाईन फसवणुकीबाबत जनजागृती करत असतांना शिक्षित नागरिकही ऑनलाईन फसवणुकीला बळी पडत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

कुठल्याही अनोळखी व्यक्तीला आपल्या बँक खात्याच्या बाबत कुठलीही माहिती कुणाला देऊ नका, ओटीपी देऊ नका आणि शक्यतो बँकेतून बोलत आहे असे सांगून संवाद साधणाऱ्या व्यक्तीशी बोलूच नका असंही आव्हान सायबर पोलीसांनी अनेकदा केलेले आहे.