विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! मुंबई विद्यापीठाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी पुन्हा मुदतवाढ

मुंबई विद्यापीठाच्या पदवी आणि पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेसाठी 25 ऑगस्ट 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. विद्यापीठाने एक प्रसिद्धी पत्रक जारी करत याबाबत माहिती दिली आहे.

विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! मुंबई विद्यापीठाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी पुन्हा मुदतवाढ
Mumbai Univercity
| Updated on: Aug 20, 2025 | 9:15 PM

मुंबई विद्यापीठीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. मुंबई विद्यापीठाच्या पदवी आणि पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेसाठी 25 ऑगस्ट 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. विद्यापीठाने एक प्रसिद्धी पत्रक जारी करत याबाबत माहिती दिली आहे. विद्यापीठाने परिपत्रकात नेमकं काय म्हटलं आहे ते सविस्तर जाणून घेऊयात.

मुंबई विद्यापीठाने प्रसिद्धीपत्रकात म्हटले की, ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने मुंबई विद्यापीठाशी सलग्नित महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालये, मान्यताप्राप्त शिक्षण संस्था आणि विद्यापीठ शैक्षणिक विभागाच्या 2025-2026 या शैक्षणिक वर्षातील प्रथम वर्ष पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी 25 ऑगस्ट 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेशित होऊ इच्छिणाऱ्या काही विद्यार्थ्यांचे पुनर्परीक्षा आणि पुनर्मूल्यांकनाचे जाहीर झालेले निकाल तथा व्यापक विद्यार्थीहित लक्षात घेऊन सर्व इच्छुक विद्यार्थ्यांना प्रवेश घेता यावा तसेच कोणताही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये यासाठी मुंबई विद्यापीठामार्फत प्रवेशप्रक्रियेस 25 ऑगस्ट 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

मुंबई विद्यापीठामार्फत निर्गमित करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर सामान्य गुणवत्ता यादीनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश द्यायचा असून प्रवेश देऊन जागा रिक्त राहिल्यास महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर गुणवत्ता यादी जाहीर करून विद्यार्थ्यांना प्रवेशित करावे असे परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक डॉ. पूजा रौंदळे यांनी सांगितले.

ज्या विद्यार्थ्यांना प्रथम वर्ष पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश घ्यायचा आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाच्या https://mu.ac.in/admission या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन प्रवेशपूर्व ऑनलाइन नावनोंदणी करणे बंधनकारक आहे. तसेच ज्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यायचा आहे, त्या महाविद्यालयाचा संबंधित अभ्यासक्रमांसाठीचा ऑनलाईन अर्जही भरणे अनिवार्य असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना प्रवेशीत करण्याची प्रक्रिया 25 ऑगस्ट 2025 या विहित कालावधीत पूर्ण करावी असेही त्यांनी सांगितले.

मुंबई विद्यापीठात खालील अभ्यासक्रमांचा समावेश

बी.ए, बी.एस्सी, बी.कॉम, बीए.एमएमसी, बी.एसडब्ल्यू, बीए (फिल्म टेलेव्हिजन अँड न्यू मीडिया प्रोडक्शन), बीए (फ्रेंच स्टडीज), बीए (जर्मन स्टडी), बॅचलर ऑफ कलिनरी आर्ट, बीए-एमए (इंटिग्रेटेड कोर्स इन जर्मन स्टडीज), बीए-एमए (इंटिग्रेटेड कोर्स इन पाली) बीएमएस-एमबीए (पाच वर्षीय एकात्मिक अभ्यासक्रम) यासह इतरही अनेक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु आहे.

Follow Us