रात्रभर अभ्यास करताय? ‘या’ 4 सवयींनी अभ्यासात होईल जबरदस्त सुधारणा!

रात्री अभ्यास करणं हा अनेक विद्यार्थ्यांसाठी यशाचा मार्ग ठरू शकतो. पण त्यासाठी योग्य सवयी, आरोग्याची काळजी, आणि शांत वातावरण आवश्यक आहे. म्हणूनच या काही टिप्स लक्षात घेतल्या, तर तुम्ही रात्रीही एकाग्रतेने आणि चांगल्या गुणवत्तेने अभ्यास करू शकता.

रात्रभर अभ्यास करताय? ‘या’ 4 सवयींनी अभ्यासात होईल जबरदस्त सुधारणा!
| Edited By: | Updated on: Jun 27, 2025 | 12:34 PM

सकाळी लवकर उठून अभ्यास करणे सगळ्यांनाच शक्य होत नाही. काही विद्यार्थ्यांना सकाळी जाग येत नाही, तर काहीजण शाळा, कॉलेज, ट्युशन किंवा इतर जबाबदाऱ्या सांभाळताना सकाळचा वेळ गमावतात. अशा वेळी रात्रीचा अभ्यास हा एक चांगला पर्याय ठरतो. रात्री वातावरण शांत असते, फोनचे आणि बाहेरचे व्यत्यय कमी असतात. त्यामुळे मेंदू अधिक एकाग्र राहतो आणि अभ्यासाची गुणवत्ता सुधारते. मात्र रात्री अभ्यास करताना काही महत्त्वाच्या टिप्स लक्षात घेतल्या, तर तो अधिक फायदेशीर ठरतो.

1. चांगली झोप

दिवसभराची झोप पूर्ण झाल्याशिवाय रात्री अभ्यास करणे कठीण ठरते. झोप कमी झाली, तर थकवा, डोळ्यांवर ताण आणि एकाग्रतेचा अभाव निर्माण होतो. त्यामुळे रात्री अभ्यास करायचा असेल, तर दिवसा ६-७ तासांची शांत झोप घेणं अत्यावश्यक आहे. झोप पूर्ण झाल्यास मेंदू अधिक ताजातवाना राहतो आणि अभ्यासामध्ये टिकून राहण्याची क्षमता वाढते.

2. कॉफी

रात्री अभ्यास करताना झोप येणं ही सामान्य बाब आहे. अशावेळी कॉफी किंवा ग्रीन टीसारखी पेयं मेंदूला सतर्क ठेवतात. विशेषतः कॅफिनमुळे मेंदू सतत अ‍ॅक्टिव्ह राहतो आणि झोप दूर राहते. मात्र कॉफीचा अतिरेक टाळा. दिवसभरात १-२ कप कॉफी पुरेशी आहे. जास्त कॅफिनमुळे झोपेचं चक्र बिघडू शकतं.

3. प्रकाश

अनेक वेळा विद्यार्थी फक्त टेबल लॅम्प लावतात आणि इतर खोली अंधारात ठेवतात. यामुळे झोप येण्याची शक्यता वाढते. अंधार वातावरण झोपेस प्रोत्साहन देतो. त्यामुळे संपूर्ण खोलीमध्ये सौम्य पण समप्रकाश असावा. अभ्यास करताना डोळ्यांवर ताण येऊ नये यासाठी प्रकाश थेट पुस्तकावर पडणं आवश्यक आहे. डोळ्यांची काळजी घेतली, तर अभ्यास अधिक वेळ टिकून राहतो.

4. बिछान्यावर अभ्यास करू नये

बिछान्यावर किंवा गादीवर बसून अभ्यास करणे टाळा. यामुळे शरीर रिलॅक्स मोडमध्ये जातं आणि झोप येते. त्याऐवजी टेबलावर बसून, पाठ सरळ ठेवून अभ्यास करा. दर काही वेळाने थोडं चालणं, स्ट्रेचिंग करणं यामुळे रक्तप्रवाह सुरळीत राहतो आणि मेंदू अधिक अ‍ॅक्टिव्ह राहतो. अशा सवयी मेंदूचं कार्यक्षमता वाढवतात आणि अभ्यासात टिकून राहता येतं.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)