
जर तुमच्यात उत्साह असेल तर कोणतीही अडचण तुम्हाला रोखू शकत नाही. हे सिद्ध करून दाखवलं आहे नांदेडचा वैभव पैतवार याने. वैभव हा केवळ एक यशस्वी उमेदवारच नाही तर हजारो तरुणांसाठी एक जिवंत प्रेरणा म्हणून उदयास आला आहे. सिडको कॅम्पसमधील गुरुवार बाजार परिसरात आई आणि भाऊ याच्यासोबत राहतो. वैभवच्या आईने मजुरी करून फक्त मुलांची भूक भागवली नाही तर, त्यांना योग्य शिक्षण देखील दिलं. त्यामुळे असं सांगायला हरकत नाही की, आईच्या कष्टाचं फळ वैभवने दिलं आहे.
वैभव याच्यासोबत एका प्रसंग घडला, तेव्हा वैभव दहावी इयत्तेत शिकत होता. 2008 मध्ये पतंग उडवत असताना विजेचा झटका लागला ज्यामुळे वैभव याला दोन्ही हात गमवावे लागले आणि एक क्षणात पूर्ण आयुष्य बदलून गेलं. हात गमावले तरी वैभवने मनातील जिद्द गमावली नाही. वेदन सहन करत वैभवने यशाचं शिखर गाठलं…
या अपघातानंतरही त्याने हिंमत गमावली नाही आणि पायांनी लिहायला शिकला. त्याने कठोर अभ्यास केला आणि अखेर एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाला. आता तो मुंबईत महसूल सहाय्यक म्हणून काम करणार आहे आणि त्याचे स्वप्न पूर्ण करणार आहे. वैभवच्या प्रवासाची चर्चा संपूर्ण नांदेडमध्ये होत आहे. त्याचा हा विजय केवळ त्याचा स्वतःचा नाही तर जीवनात येणाऱ्या अडचणींशी झुंजणाऱ्या सर्व लोकांसाठी एक उदाहरण आहे. वैभव पैतवार याची कहाणी आपल्याला शिकवण देते. आपण किती दूर जाऊ शकतो हे आपल्या शारीरिक मर्यादा नाही तर आपली इच्छाशक्ती ठरवते.
वैभव दहावीत असताना त्याच्या वडिलांचं निधन झालं. वडिलांच्या निधनानंतर संपूर्ण जबाबदारी वैभव याच्या आईच्या खांद्यावर आली. अशात वैभव देखील मागे हटला नाही. क्लास वन अधिकारी होण्याचं वैभव याचं स्वप्न आहे. सांगायचं झालं तर, प्रतिभा ही कोणावर अवलंबून नसते असं म्हटलं जातं, वैभवनेही तेच केलं, विजयाबद्दल जिल्ह्यात सर्वत्र वैभवचं कौतुक होत आहे.