‘कॉफी विथ करण’मध्ये राडा! रवी किशनने करण जोहरची पकडली कॉलर, अक्षय कुमार पडलामध्ये
Coffee With Karan Viral Video: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये कॉफी विथ करण या शोमध्ये राडा झाल्याचे दिसत आहे. आता करण जोहर आणि रवि किशनमध्ये नेमकं काय झालं? वाचा...

बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माता करण जोहरचा ‘कॉफी विथ करण’ हा शो कायमच चर्चेत असतो. या शोमध्ये सहभागी होणारे स्टार्स नेहमीच शोचा होस्ट करण जोहरला मनातील गोष्टी सांगत असतात. कधी न ऐकलेले किस्से या शोमध्ये ऐकायला मिळतात. पण सध्या हा शो एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. कारण शोमध्ये मोठा राडा झाला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
कॉफी विथ करण या शोच्या आगामी भागात अभिनेता अक्षय कुमार आणि भोजपूरी सुपरस्टार रवी किशन उपस्थिती लावणार आहेत. पण सेटवर काही असे घडले ज्याचा कोणीही विचार केला नसेल. रवी किशनने करण जोहरची थेट कॉलरच पकडली. आता नेमकं काय झालं? वाचा…
करण जोहरने रवी किशनला गोरखपूरला तुम्ही स्पेन समजता का? असा प्रश्न विचारला होता. तो ऐकून रवी किशन चिडतो. रवी किशन मजेशीर अंदाजात करण जोहरच्या अंगावर धावून जातो. त्याची कॉलर पकडतो आणि सोफ्यावर आपटतो. ते पाहून तेथेच उभा असलेला अक्षय कुमार पळत येतो. दोघांना सोडवण्याचा प्रयत्न करतो. रवी किशन आणि करण जोहर या दोघांमध्ये मजेशीर अंदाजात झालेल्या भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
काय आहे सत्य?
व्हायरल क्लिपमध्ये करण जोहर पिंक सूट घालून शोच्या काउचवर बसलेला दिसतात. तर रवी किशन पिवळ्या-हिरव्या रंगाच्या सूटमध्ये दिसत आहे. संवादादरम्यान करण जोहर गोरखपूर आणि स्पेनबाबत रवी किशन यांच्या जुन्या विधानाचा उल्लेख करत विचारतो की, खरोखर गोरखपूर स्पेनसारखे वाटते का? प्रश्न ऐकताच रवी किशन विनोदी अंदाजात करण जोहरकडे जातो आणि त्याला काउचवर पाडतो. दोघांमधील हा संपूर्ण सीन एखाद्या कॉमेडी स्किटसारखा दिसतो. करण हसत वाचण्याचा प्रयत्न करतो, तर अक्षय कुमार मध्यस्थी करत याचा भरपूर आनंद घेतात.
रवी किशनचे गोरखपूर-स्पेनचे विधान काय होते?
खरे तर, ऑगस्ट २०२६ मध्ये गोरखपूरमधील एका कार्यक्रमादरम्यान रवी किशन यांनी शहराच्या विकासाची प्रशंता करताना भोजपुरीत म्हटले होते की, त्यांना गोरखपूर स्पेनसारखे आणि स्मार्ट सिटी वाटते. त्यांच्या या विधानाने सोशल मीडियावर खूप चर्चा झाली होती. रवी किशनच्या विधानावर विरोधी पक्षांनी प्रश्न उपस्थित केले होते. आता करणने तोच प्रश्न रवी किशनला शोमध्ये विचारला.