आमिर खान महिनाभरापासून होता शूटर्सच्या निशाण्यावर, एका सवयीने वाचवले प्राण; पोलिसांच्या तपासात धक्कादायक खुलासा
टायगर श्रॉफच्या कारवरील गोळीबारानंतर बॉलिवूडमधील कलाकारांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणातील संपूर्ण कट, त्यामागील हेतू आणि इतर कलाकारांना धोका होता का, हे पुढील तपासातून स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे.

अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर झालेल्या गोळीबाराच्या प्रकरणात आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील कथित हल्लेखोरांचं सुरुवातीचं लक्ष्य अभिनेता आमिर खान असल्याचा दावा पोलिसांच्या सूत्रांनी केला आहे. आमिर खानच्या घराच्या परिसरात हल्लेखोरांनी तीन वेळा रेकी केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, अभिनेत्यापर्यंत पोहोचणं कठीण असल्याने त्यांनी आपला प्लॅन बदलला आणि टायगर श्रॉफला लक्ष्य केलं, असं वृत्त आहे. मुंबई पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून, बॉलिवूडमधील कलाकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कथित हल्लेखोर फुलसिंग आणि रेहान अन्सारी सप्टेंबरमध्ये मुंबईत आले होते. जवळपास महिनाभर मुंबईत मुक्काम करताना त्यांनी आमिर खानच्या वांद्रे इथल्या निवासस्थानाच्या परिसराची तीन वेळा रेकी केल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, आमिर खान अनेकदा चित्रपटांच्या शूटिंगसाठी बाहेर असायचा किंवा घरी आल्यानंतर अनेक दिवस बाहेर पडत नसत. त्यामुळे त्याच्यापर्यंत पोहोचणं कथित हल्लेखोरांना कठीण जात होतं. परिणामी, त्यांनी टायगर श्रॉफला लक्ष्य करण्याचा निर्णय घेतल्याचं वृत्त इंडियन एक्स्प्रेसने पोलिसांच्या सूत्रांच्या हवाल्याने दिलं आहे.
18 ऑक्टोबर रोजी मुंबईतील जुहू परिसरात टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार झाला होता. या घटनेत पाच ते सहा गोळ्या झाडण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. टायगर या हल्ल्यातून बचावला; मात्र त्याचा चालक आणि एक नागरिक जखमी झाल्याचं वृत्त आहे. तपासातील माहितीनुसार, टायगर श्रॉफ रविवारी जुहू इथल्या मैदानावर फुटबॉल खेळण्यासाठी जात असे. त्याच्या या नियमित दिनक्रमाची माहिती कथित हल्लेखोरांना सोशल मीडिया आणि इन्स्टाग्रामवरील पोस्टमधून मिळाल्याचा संशय आहे. आमिर खानपर्यंत पोहोचणं कठीण असल्याने टायगर अधिक सहज उपलब्ध लक्ष्य असल्याचं त्यांना वाटल्याचा दावा करण्यात आला आहे.
या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित व्यक्तींच्या भूमिकेचाही तपास सुरू आहे. अनिल पंडित नावाच्या कथित सूत्रधाराने या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारल्याचा दावा सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये केला आहे. आमिर खानला जुलैमध्ये धमक्या मिळाल्या होत्या. त्याच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित आक्षेपांचा उल्लेख त्या धमक्यांमध्ये करण्यात आला होता. या प्रकरणात अनेक संशयितांना अटक करण्यात आली असून, कथित हल्लेखोरांना मदत करणाऱ्या व्यक्तींची भूमिका तपासली जात आहे.