Naseeruddin Shah : हिंमत असेल तर निवडणूक लढव, मी तुला…अभिनेता आणि भाजप कार्यकर्त्याचं नसीरुद्दीन शाह यांना आव्हान, नवा वाद पेटणार?
Gajendra Chauhan On Naseeruddin Shah : 'महाभारत' मालिकेत दुर्योधनाची भूमिका साकारलेले अभिनेते आणि भाजप कार्यकर्ते गजेंद्र चौहान यांनी अभिनेते नसीरुद्दीन शाह यांना खुलं आव्हान दिलं आहे.

‘महाभारत’ मालिकेत दुर्योधनाची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते गजेंद्र चौहान त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. या अभिनेत्यानं अलीकडेच नसीरुद्दीन शाह यांना सल्ला दिला आणि त्यांच्या वक्तव्यावर पलटवारही केला. नसीरुद्दीन शाह यांनी स्वतःला ‘दीमागी नक्षलवादी’ म्हटल्यानं ते चर्चेत आले आहेत आणि त्यांच्या या वक्तव्यामुळे काही लोक दुखावले गेले आहेत.
एएनआयशी बोलताना गजेंद्र चौहान म्हणाले, ‘नसीरुद्दीन, मी तुमचा एक व्हिडिओ पाहिला. तो पाहून मला वाईट वाटलं. तुम्ही एक महान कलाकार आहात. या देशानं आणि येथील नागरिकांनी तुम्हाला खूप प्रसिद्धी, ओळख आणि आदर दिला आहे, तरीही तुमची भाषा इतकी खालच्या पातळीवर गेली आहे. तुम्ही स्वतःला ‘दीमागी नक्षलवादी’ म्हणवता. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देशातून नक्षलवाद समूळ नष्ट करण्यासाठी कारवाई केली आहे. मग हा नक्षलवाद आला कुठून? जर तुम्ही स्वतःला ‘दीमागी नक्षलवादी’ समजत असाल, तर तुम्ही भ्रमात जगत आहात आणि तुमच्याच काल्पनिक जगात हरवून गेला आहात.’
‘तुम्ही नेहमी देशाच्या सरकारवर आणि सत्ताधारी पक्षावर टीका करत असता. मी तुमचे अनेक व्हिडिओ आणि वक्तव्ये पाहिली आहेत, आणि तुमची वक्तव्ये नेहमीच एकतर्फी असतात. तुम्ही विरोधी पक्षाबद्दल काही बोलत नाही किंवा सरकारच्या चांगल्या कामाची प्रशंसा करत नाही. जेव्हा देशात चांगलं काम होतं किंवा सरकार एखादा सकारात्मक उपक्रम हाती घेतं, तेव्हा त्याबद्दलही बोला.’
गजेंद्र चौहान यांनी नसीरुद्दीन शाह यांना आव्हान दिलं
‘त्या कामांची प्रशंसा करणारे ट्विट करा. जर तुम्हाला सरकारचा इतका विरोध करायचा असेल, तर तुम्ही निवडणुका का लढवत नाही? हिंमत असेल तर निवडणुक लढवा. मी तुम्हाला आव्हान देतो, तुम्ही जिथे कुठे निवडणूक लढवाल, मी तुमच्या विरोधात लढेन आणि तुम्हाला हरवेन. या देशानं तुम्हाला एक कलाकार म्हणून खूप आदर आणि सन्मान दिला आहे, आणि ते सर्व उद्ध्वस्त झालं आहे. मी भाजपचा कार्यकर्ता आहे. माझी पक्षाला ही विनंती आहे की, जर नसीरुद्दीन शाह यांनी कुठेही निवडणूक लढवली, तर त्यांनी मला त्यांच्या विरोधात उमेदवारी द्यावी.’ असं गजेंद्र यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका भाषणात ‘माइंडफुल नक्षलवादी’ हा शब्दप्रयोग प्रथम वापरला. त्यानंतर, सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना टार्गेट करण्यासाठी हा शब्दप्रयोग वापरण्यास सुरुवात केली आणि त्यांच्या शैक्षणिक पार्श्वभूमीचा विचार न करता त्यांना कट्टर माओवादी समर्थक म्हणून चित्रित केलं.