
अभिनेता हृतिक रोशनची पूर्व पत्नी सुझान खानची आई झरीन खान यांचं नुकतंच निधन झालं होतं. सोमवारी 11 नोव्हेंबर 2025 रोजी मुंबईत त्यांच्या प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी हृतिक रोशन, त्याची गर्लफ्रेंड सबा आझाद, मुलगा हृदान, सुझान खान, फरदीन खान, राणी मुखर्जी, मलायका अरोरा, संजय खान, जायेद खान हे सर्व प्रार्थना सभेला पोहोचले होते. 83 वर्षीय जितेंद्रसुद्धा झरीन खान यांच्या प्रार्थना सभेला उपस्थित होते. परंतु यावेळी त्यांच्यासोबत असं काही घडलं, जे पाहून चाहते काळजी व्यक्त करत आहेत. सोशल मीडियावर जितेंद्र यांचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. प्रार्थना सभेला पोहोचलेले जितेंद्र तिथल्या एका पायरीला अडखळून जोरात जमिनीवर पडतात. तेव्हा त्यांच्या आजूबाजूला असलेले लोक त्यांना उचलण्यासाठी धावून येतात. सुदैवाने त्यांना कोणतीही दुखापत होत नाही. आजूबाजूच्या लोकांच्या मदतीने ते पुन्हा उठून उभे राहतात आणि ठीक असल्याचं आश्वासन देतात.
ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये ते त्यांच्या कारमधून उतरून बाहेर चालू लागतात. पुढे चालत येत असताना खालील पायरीकडे त्यांचं लक्ष जात नाही. त्यामुळे तिथे अडखळून ते जोरात खाली पडतात. त्यानंतर तिथे आजूबाजूला असलेले लोक त्यांना उचलण्यासाठी धावत येतात. तेव्हा जितेंद्र त्यांच्या मदतीने उठून उभे राहतात आणि हसत ठीक असल्याचं सांगतात. त्यांच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘त्यांनी साधे शूज घालायला हवे होते. शूजमुळेच त्यांचा तोल गेला’, असं एकाने लिहिलं. तर ‘आशा करते की ते बरे असतील’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय.
यानंतर प्रार्थना सभेतून बाहेर येतानाचा त्यांचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये ते पापाराझींशी बोलताना दिसत आहेत. तेव्हा पुन्हा एकदा ते मस्करीत पायरीजवळ जाऊन अडखळण्याचं नाटक करतात. हे पाहून पापाराझीसुद्धा हसू लागतात. जितेंद्र यांचा मनमिळाऊ आणि हसरा स्वभाव पाहून चाहतेसुद्धा त्यांचं कौतुक करत आहेत.