प्रसिद्ध अभिनेत्रीचे निधन, 12 वर्ष आजाराशी झुंज दिल्यानंतर डॉक्टरांकडे मागितली मदत
ऑस्कर नॉमिनेटेड अभिनेत्री बार्बरा बॅरी यांचे निधन झाले आहे. गेल्या 12 वर्षे त्या गंभीर आजाराशी झुंज देत होत्या. अखेर वयाच्या 95व्या वर्षी त्यांचे निधन झाले आहे.

हॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री बार्बरा बॅरी यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांनी बुधवारी मॅनहॅटन येथे अखेरचा श्वास घेतला. बार्बरा या चित्रपट, दूरदर्शन आणि रंगमंच क्षेत्रातील त्यांच्या उत्कृष्ट योगदानासाठी ओळखले जात होते. अभिनेत्री बार्बरा बॅरी यांना त्यांच्या दीर्घ कारकिर्दीत अनेक नामवंत पुरस्कारांसाठी नामांकन मिळाले होते. त्या ऑस्कर, एमी आणि टोनी अवॉर्डसाठी नॉमिनेट झाल्या होत्या. बार्बरा यांना त्यांच्या ‘ब्रेकिंग अवे’ या चित्रपटासाठी ओळखले जाते. या चित्रपटातील त्यांच्या अप्रतिम अभिनयासाठी अभिनेत्रीला ऑस्करसाठी नामांकन मिळाले होते. त्यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
अभिनेत्री बार्बरा बॅरी स्टीफन सॉन्डहाइम यांच्या चर्चित म्युझिकल ‘कंपनी’च्या मूळ ब्रॉडवे प्रॉडक्शनचाही भाग होत्या. अभिनेत्रीने बुधवार, २८ ऑक्टोबर रोजी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे निधन न्यूयॉर्क सिटीतील राहत्या घरी झाल्याची माहिती समोर आली आहे. अभिनेत्रीची मुलगी जेन हार्निक यांनी न्यूयॉर्क टाइम्सला त्यांच्या निधनाची बातमी दिली.
दीर्घकाळ आजारी होत्या बार्बरा
ईटाम्समध्ये प्रकाशित झालेल्या बातमीनुसार बार्बरा बॅरी कर्करोगाने ग्रस्त होत्या आणि त्या दीर्घकाळ आजारी होत्या. मिडिया रिपोर्टनुसार अभिनेत्रीचा मृत्यू वैद्यकीय सहाय्याने झाला होता, म्हणजे दीर्घकाळ आजारी असल्याने त्यांनी मृत्यूसाठी डॉक्टरांची मदत घेतली होती. त्या फुफ्फुसाच्या आजाराने त्रस्त होत्या.
बार्बरा यांनी चित्रपटांकडे वळण्यापूर्वी टीव्हीद्वारे आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांना टीव्ही शो ‘बार्नर मिलर’मुळे ओळख मिळाली होती. त्यांच्या चित्रपट कारकिर्दीत ‘वन पोटॅटो, टू पोटॅटो’सारखे उत्कृष्ट चित्रपट समाविष्ट आहेत. ही कथा समाजातील कटू सत्य उलगडून दाखवते. बार्बरा बॅरी यांच्या निधनानंतर हॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. नामवंत कलाकार त्यांच्या निधनानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहत आहेत.