या गाण्यातील एका सीनसाठी माधुरीने घेतलेले 15 रीटेक, सीन आणि गाणं आजही प्रचंड सुपरहिट

माधुरी दीक्षितने तिच्या सर्वात सुपरहिट गाण्यामधील एका सीनसाठी 10 ते 15 वेळा घेतला होता रीटेक. गाण्यातील त्या सीनने वेधलेलं सर्वांचं लक्ष.

या गाण्यातील एका सीनसाठी माधुरीने घेतलेले 15 रीटेक, सीन आणि गाणं आजही प्रचंड सुपरहिट
Image Credit source: Social media
| Updated on: Oct 14, 2026 | 3:15 PM

बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित आणि सलमान खान यांचा ‘हम आपके हैं कौन’ हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या आवडत्या चित्रपटांपैकी एक आहे. 1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील गाणी आणि अनेक प्रसंग आजही चाहत्यांच्या स्मरणात आहेत. विशेषतः ‘दीदी तेरा देवर दिवाना’ या गाण्याने प्रचंड लोकप्रियता मिळवली. मात्र, या गाण्यातील एका खास सीनच्या चित्रीकरणासाठी निर्मात्यांना आणि कलाकारांना चांगलीच मेहनत घ्यावी लागली होती. खुद्द माधुरी दीक्षितने अलीकडेच हा किस्सा सांगितला.

‘कोण होणार करोडपती’ या मराठी रिअॅलिटी शोमध्ये माधुरी दीक्षितने चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचा हा मजेशीर अनुभव सांगितला. शोमध्ये स्पर्धक प्राजक्ता तावडे यांनी माधुरीला खास सरप्राइज दिले. त्या कथ्थक नृत्यांगना असून, त्यांनी ‘हम आपके हैं कौन’ चित्रपटातील माधुरीच्या प्रसिद्ध लूकची झलक सादर केली. यामुळे माधुरीला चित्रपटाच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.

Loading...

यावेळी तिने ‘दीदी तेरा देवर दिवाना’ या गाण्यातील फूल आणि गुलेलच्या सीनबद्दल सांगितले. हा प्रसंग पडद्यावर सहज आणि मजेशीर दिसत असला तरी त्याचे चित्रीकरण करताना अनेक अडचणी आल्या होत्या. कधी निशाणा चुकत होता तर कधी फूल तुटत होते किंवा गुलेलमधून निघून दूर जात होते. त्यामुळे हा सीन व्यवस्थित चित्रित करण्यासाठी तब्बल 10 ते 15 रीटेक घ्यावे लागले.

सीन विचित्र दिसेल अशी निर्मात्यांना होती भीती

या सीनबद्दल निर्मात्यांनाही चिंता वाटत होती. पडद्यावर हा प्रसंग विचित्र दिसेल का, अशी त्यांना भीती होती. मात्र, माधुरी आणि कोरिओग्राफर्सनी त्यांना समजावले की, योग्य कॅमेरा अँगलचा वापर केल्यास हा सीन सुंदर आणि गोड दिसेल. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि हा प्रसंग प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला.

सूरज आर. बडजात्या दिग्दर्शित ‘हम आपके हैं कौन’ या चित्रपटात सलमान खान आणि माधुरी दीक्षित यांच्यासोबत अनुपम खेर, रीमा लागू, आलोक नाथ, रेणुका शहाणे, मोहनीश बहल आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांसारख्या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. कौटुंबिक नाती, प्रेम आणि भावनांवर आधारित या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us