
मालिका आणि अनेक चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी मराठी अभिनेत्री रसिका सुनीलचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. रसिकाच्या नवऱ्याने तिला व्हिडीओ कॉल केला असता त्याच्या एका कृतीने तिला रडू आलं. हा व्हिडीओ तिने सोशल मीडियावरही शेअर केला आहे.
अमेरिकेत असलेल्या नवऱ्याशी बोलतानाचा रसिकाचा व्हिडीओ कॉल
रसिका सुनीलने 2021 मध्ये आदित्य बिलागीशी लग्न केलं. काही वर्ष या दोघांनी एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी गोव्यात थाटामाटात लग्नगाठ बांधली. दोघांच्या लग्नाचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. रसिराचा नवरा अमेरिकेतील एका मोठ्या कंपनीत कामाला आहे. लग्न झाल्यानंतर ती कधी अमेरिकेत तर कधी भारतात असते. सध्या रसिका भारतात आणि आदित्य अमेरिकेत आहे.
रशच्या वाढदिवसानिमित्ताने आदित्यने दिल्या अनोख्या शुभेच्छा
अमेरिकेवरून तिच्या नवऱ्याने तिला जेव्हा व्हिडीओ कॉल केला तेव्हा रसिका त्याच्या एक कृतीमुळे खूप भावूक झालेली पाहायला मिळाली. त्याचं कारण असं की, तिच्याकडे जो पेट म्हणजे कुत्र्याचं पिल्लू आहे त्याला ती भाऊ मानते. त्याचं नाव आहे ‘रश’. रशच्या वाढदिवसानिमित्ताने आदित्यने अनोख्या अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत.
रशसारखा बर्फाचा पुतळा तयार
आदित्यने रशसारखा बर्फाचा पुतळा तयार केला, आणि तो हे बनवत असताना रसिका ते व्हिडीओकॉलवर पाहत होती. मात्र तेव्हा तिलाही हे समजत नव्हतं कि तो नेमकं काय बनवतोय ते. पण जेव्हा आदित्यची कलाकृती पूर्ण झाली तेव्हा त्याने ती रसिकाला दाखवली आणि ते पाहाताच तिला रडू आलं. ती भावूक झाली. याचा व्हिडीओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
“आमच्या लहान बाळासाठी…”
रसिकाने आदित्यचा व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे, “आमच्या लहान बाळासाठी आमचं हे प्रेम अतुलनीय आहे. आदित्य हा व्हिडीओ रेकॉर्डिंग करताना तुझी परवानगी घेतली नाही, यासाठी सॉरी. आज ‘रश’चा वाढदिवस आहे. ‘रश’ हे आमचं बाळ आहे.” रसिकाने शेअर केलेल्या या व्हिडीओवर इतर कलाकार मंडळींसह चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान, रसिका नेहमी रशबरोबरचे सुंदर फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तसंच अभिनेत्री रक्षाबंधन, भाऊबीज रशबरोबर साजरी करताना दिसते.
रसिका तसं आता अनेक नाटक, चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करत असते. मात्र तिला खरी ओळख मिळाली ते झी मराठीवरील ‘ माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेमुळे. या मालिकेतील तिची शनायाची भूमिका प्रचंड गाजली. ती भूमिका आजही प्रेक्षकांना आठवते.