Adinath Kothare: काल रात्री जे भांडण झालं… आदिनाथ कोठारे असं का म्हणाला? सर्वत्र चर्चा
Adinath Kothare : सध्या मराठमोळा अभिनेता आदिनाथ कोठारे हा चांगलाच चर्चेत आहे. रामायण या सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारल्यानंतर आता त्याचा ‘मिरांडा वॉर्निंग’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

मराठमोळा अभिनेता आदिनाथ कोठारे हा सध्या चांगलाच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी आदिनाथ खासगी आयुष्यामुळे चर्चेत होता. आता आदिनाथ त्याच्या आगामी चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. आदिनाथचा आगामी सिनेमा ‘मिरांडा वॉर्निंग’चा थरारक ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. आता ट्रेलरमध्ये नेमकं काय आहे? एकदा पाहा…
चित्रपट पाहताना प्रत्येक दृश्यात पुढे काय घडणार, कोण खरं बोलतंय आणि कोण खोटं, गुन्हेगार नेमका कोण, या प्रश्नांची उत्तरे शोधण्यात प्रेक्षकांना जी मजा मिळते, तोच अनुभव आदिनाथ कोठारेच्या ‘मिरांडा वॉर्निंग’ चित्रपटातून अनुभवता येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते.
काय आहे चित्रपटाचा ट्रेलर?
‘मिरांडा वॉर्निंग’ चित्रपटाची कथा एका रिसॉर्टमध्ये घडणाऱ्या रहस्यमय घटनेभोवती फिरते. दोन जोडपी, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील गुंतागुंत, अचानक घडलेली हत्या आणि त्यानंतर सुरू होणारा पोलिस तपास… या सगळ्या घटनांमधून संशयाचे जाळे अधिकाधिक घट्ट होत जाते. प्रत्येक पात्राची एक वेगळी बाजू समोर येते. प्रत्येकाच्या बोलण्यात काहीतरी लपलेले असल्याची जाणीव होते. त्यामुळे नेमके सत्य काय आणि या प्रकरणामागील खरा चेहरा कोणता, याचा शोध घेणे हेच या चित्रपटाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. या तपासाची जबाबदारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक वर्तक यांच्यावर आहे. आपल्या अनुभवातून गुन्ह्यांची उकल करणाऱ्या या अधिकाऱ्यासमोर मात्र हे प्रकरण अनेक प्रश्न उभे करते. पुरावे, जबाब आणि घटनाक्रम यांची सांगड घालत सत्यापर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रवास चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
विशेष म्हणजे, ‘मिरांडा वॉर्निंग’ केवळ खुनी कोण आहे याभोवती फिरत नाही, तर कायद्याची प्रक्रिया आणि प्रत्यक्ष न्याय यातील फरक अधोरेखित करणारा विचारही मांडतो. एखाद्या घटनेकडे केवळ कायद्याच्या चौकटीतून पाहायचे की त्यामागील परिस्थिती आणि वास्तव समजून घ्यायचे, असा महत्त्वपूर्ण प्रश्न हा चित्रपट प्रेक्षकांसमोर ठेवतो. ट्रेलरमधून चित्रपटाच्या कथानकाची केवळ एक झलक समोर आली असली, तरी संपूर्ण रहस्य जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना चित्रपटगृहात जावे लागणार आहे. विशेषतः सस्पेन्स क्राईम थ्रिलर आवडणाऱ्या आणि चित्रपट पाहताना स्वतःच गुन्हेगाराचा अंदाज बांधणाऱ्या प्रेक्षकांसाठी ‘मिरांडा वॉर्निंग’ हा एक उत्सुकतापूर्ण पर्याय ठरणार आहे.
कधी प्रदर्शित होणार सिनेमा?
‘मिरांडा वॉर्निंग’ या चित्रपटात आदिनाथ कोठारे, जान्हवी किल्लेकर आणि इतर काही कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट २७ नोव्हेंबर २०२६ रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.