Adipurush | ‘आदिपुरुष’ची तब्बल 10 हजार तिकिटं दान करणार; प्रसिद्ध निर्मात्याची घोषणा

यामध्ये अभिनेता प्रभासने राघव, क्रिती सनॉने जानकी, सैफ अली खानने लंकेश, सनी सिंगने शेष आणि देवदत्त नागेनं बजरंगची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचा दुसरा ट्रेलर तिरुपतीमधील भव्य कार्यक्रमात लाँच करण्यात आला.

Adipurush | आदिपुरुषची तब्बल 10 हजार तिकिटं दान करणार; प्रसिद्ध निर्मात्याची घोषणा
Adipurush
Image Credit source: Youtube
| Updated on: Jun 08, 2023 | 11:56 AM

मुंबई : ‘बाहुबली’ फेम अभिनेता प्रभास पुन्हा एकदा भव्यदिव्य चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याच्या आगामी ‘आदिपुरुष’ या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. ओम राऊत दिग्दर्शित हा चित्रपट येत्या 16 जून रोजी पाच विविध भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. मात्र त्यापूर्वी एका प्रसिद्ध निर्मात्याने ‘आदिपुरुष’च्या तिकिटांबद्दल मोठी घोषणा केली आहे. या चित्रपटाची कथा रामायणावर आधारित असल्याने रामभक्तीचं कारण देत या निर्मात्याने तब्बल 10 हजार मोफत तिकिटं वाटण्याचं जाहीर केलं आहे. तेलंगणातील सरकारी शाळा, अनाथाश्रम आणि वृद्धाश्रमांना ही मोफत तिकिटं वाटली जाणार आहेत.

‘आदिपुरुष हा आयुष्यातून एकदाच अनुभवावा असा भव्यदिव्य चित्रपट आहे. त्यामुळे हा चित्रपट सर्वांनी साजरा केला पाहिजे. प्रभू श्रीराम यांच्याप्रती असलेल्या भक्तीसाठी मी चित्रपटाची दहा हजार तिकिटं तेलंगणातील सरकारी शाळा, वृद्धाश्रमांमध्ये आणि अनाथाश्रमांमध्ये वाटण्याचं जाहीर करत आहे. तिकिट उपलब्ध करून घेण्यासाठी हा गुगल फॉर्म भरा’, असं ट्विट या निर्मात्याने केलं आहे. हा निर्माता म्हणजे ‘कार्तिकेय 2’ या गाजलेल्या तेलुगू चित्रपटाचा निर्माता अभिषेक अगरवाल आहे.

ओम राऊत दिग्दर्शित या चित्रपटाची कथा रामायणावर आधारित असली तरी नव्या अंदाजात ती प्रेक्षकांसमोर मांडण्यात येत आहे. यामध्ये अभिनेता प्रभासने राघव, क्रिती सनॉने जानकी, सैफ अली खानने लंकेश, सनी सिंगने शेष आणि देवदत्त नागेनं बजरंगची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचा दुसरा ट्रेलर तिरुपतीमधील भव्य कार्यक्रमात लाँच करण्यात आला.

आदिपुरुष हा चित्रपट आधी 11 ऑगस्ट 2022 रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र नंतर ही तारीख 12 जानेवारी 2023 पर्यंत पुढे ढकलण्यात आली. या चित्रपटाच्या टीझरवर प्रेक्षकांनी आक्षेप घेतला होता. त्यानंतर काही बदल करण्यासाठी निर्मात्यांनी प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली. अखेर येत्या 16 जून रोजी 3D मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.