
छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त शो म्हणून बिग बॉस पाहिला जातो. नुकताच बॉलिवूडचा भाईजान सलमान खान सूत्रसंचालन करत असलेला बिग बॉस 19चा समारोप झाला. त्यानंतर आता सर्वांचा नजरा बिग बॉस मराठीच्या सहाव्या सिझनकडे आहेत. मराठी बिग बॉसचा पाचवा सिझन प्रचंड गाजला होता. त्यामुळे आता यंदाच्या सिझनमध्ये कोणते कलाकार दिसणार? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. आता याबाबत जोरदार चर्चा सुरु आहे.
काही दिवसांपूर्वी नृत्यांगना गौतमी पाटील बिग बॉस मराठीच्या सहाव्या सिझनमध्ये दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, एका मुलाखतीमध्ये गौतमीने या सर्व अफवा असल्याचे सांगितले. तसेत तिला या शोमध्ये सहभागी होणे शक्य नसल्याचे देखील सांगितले. त्यानंतर गौतमींच्या एन्ट्रीच्या चर्चांना पूर्णविराम लागला. पण आता तिच्या जागी दुसऱ्या एका लोकप्रिय नृत्यांगणेचे नाव जोरात चर्चेत आले आहे. ही नृत्यांगना म्हणजे सायली पाटील.
सध्या सोशल मीडियावर सायली पाटीलचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओत तो बोलताना दिसत आहे की, “मला बिग बॉस मराठीकडून दोन दिवसांपूर्वी एक मेल आला आहे. तुम्ही इंटरेस्टेड आहात का? असा प्रश्न विचारला आहे. मी काय करू? बिग बॉसमध्ये जायचे का नाही? तुम्ही कमेंट्समध्ये सांगा…” महत्त्वाचे म्हणजे, हा व्हिडीओ सायली पाटीलच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून नाही तर तिच्या एका फॅन पेजवरून शेअर करण्यात आला आहे. तिच्या ऑफिशियल प्रोफाइलवर असा कोणताही व्हिडीओ आढळला नाही. यामुळे चाहत्यांमध्ये आणखी गोंधळ निर्माण झाला आहे.
नृत्यांगना सायली पाटील कोण आहेत?
गौतमी पाटीलप्रमाणेच सायली पाटील देखील महाराष्ट्रारातील अतिशय लोकप्रिय लावणी नृत्यांगना आहेत. तिच्या दमदार अदाकारीने आणि आकर्षक नृत्याने तरुणाईच्या मनात विशेष स्थान मिळवले आहे. सायली ही विविध डान्स शो करते आणि सोशल मीडियावर तिचे रिल्स व व्हिडीओ सतत व्हायरल होत असतात. आता तिच्या ‘बिग बॉस मराठी ६’ मधील संभाव्य एन्ट्रीमुळे तिचे नाव आणखी चर्चेत आले आहे.
बिग बॉस मराठीच्या नव्या सिझनविषयी
काही दिवसांपूर्वीच ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे स्पर्धकांच्या यादीबाबत विविध नावे समोर येत आहेत. यात गौतमी पाटीलसह इतरही सेलिब्रिटींच्या एन्ट्रीच्या अफवा पसरल्या आहेत. पण सायली पाटीलच्या व्हायरल व्हिडीओने मात्र चाहत्यांची उत्सुकता द्विगुणित केली आहे.