Aishwarya Narkar: अवघ्या 4 महिन्यांत ऐश्वर्या नारकर यांच्या मालिकेनं गुंडाळला गाशा? अंतिम भागाची तारीख समोर
आता ऐश्वर्या नारकर यांच्या मालिकेबाबत सुरू असलेल्या चर्चांवर स्टार प्रवाह वाहिनी आणि स्वत: ऐश्वर्या नारकर काय स्पष्टीकरण देतात, याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. या मालिकेचे शंभर भागही पूर्ण झालेले नाहीत.

Aishwarya Narkar Serial: छोट्या पडद्यावरील मालिकांचं भवितव्य अनेकदा टीआरपीवर अवलंबून असतं. प्रेक्षकांचा अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यास काही मालिका अल्पावधीतच बंद करण्याचा निर्णय घेतला जातो. आता मराठी टेलिव्हिजन विश्वातून अशीच एक बातमी समोर आली आहे. अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांची प्रमुख भूमिका असलेली ‘आमच्या लाडक्या नाईकबाई’ ही मालिका अवघ्या चार महिन्यांतच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, मालिकेचे अद्याप 100 भागही पूर्ण झालेले नाहीत. सोशल मीडियावर यासंदर्भातील एक पोस्ट व्हायरल झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये या मालिकेच्या शेवटाबाबत चर्चा रंगू लागली आहे.
अवघ्या चार महिन्यांत मालिका होणार बंद?
ऐश्वर्या नारकर यांची ‘आमच्या लाडक्या नाईकबाई’ ही मालिका 10 ऑगस्ट 2026 रोजी स्टार प्रवाह वाहिनीवर सुरू झाली होती. या मालिकेच्या माध्यमातून ऐश्वर्या नारकर तब्बल आठ वर्षांनंतर स्टार प्रवाह वाहिनीवर परतल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या पुनरागमनाबाबत चाहत्यांमध्ये विशेष उत्सुकता होती. मालिकेत त्यांची प्रमुख भूमिका असून, त्यांच्या अभिनयाचंही कौतुक करण्यात आलं होतं. सुरुवातीला ही मालिका संध्याकाळी 6.30 वाजता प्रसारित केली जात होती. मात्र काही काळानंतर मालिकेच्या प्रसारणाच्या वेळेत बदल करण्यात आला. 12 ऑक्टोबरपासून ही मालिका दुपारी 1 वाजता दाखवली जाऊ लागली. या बदलानंतर आता मालिका बंद होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.
पहा कमेंट्स आणि पोस्ट-
शेवटचा भाग कधी प्रसारित होणार?
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्ट आणि प्रेक्षकांच्या चर्चेनुसार ‘आमच्या लाडक्या नाईकबाई’ मालिकेचा अंतिम भाग येत्या 21 नोव्हेंबर 2026 रोजी प्रसारित होण्याची शक्यता आहे. म्हणजेच, सुरू झाल्यापासून अवघ्या चार महिन्यांच्या आत ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, या मालिकेत शंभर भागही पूर्ण झालेले नसल्याची चर्चा आहे. मात्र याबाबत स्टार प्रवाह वाहिनी किंवा ऐश्वर्या नारकर यांच्याकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
कोणती नवी मालिका ‘आमच्या लाडक्या नाईकबाई’ची जागा घेणार?
दरम्यान, ‘आमच्या लाडक्या नाईकबाई’ मालिका बंद झाल्यास दुपारी 1 वाजताच्या स्लॉटमध्ये ‘विसरू नको तू मला’ ही मालिका प्रसारित केली जाण्याची शक्यता आहे. यापूर्वीही स्टार प्रवाहवरील ‘काजळमाया’, ‘तुझ्या सोबतीने’ आणि ‘वचन दिले तू मला’ यांसारख्या मालिकांनी अल्पावधीतच प्रेक्षकांचा निरोप घेतला होता.