Box Office: ‘पोन्नियिन सेल्वन 1’चा बॉक्स ऑफिसवर धमाका; बॉलिवूडच्या ‘विक्रम वेधा’ने केली निराशा

बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा बॉलिवूडची जादू पडतेय फिकी?

Box Office: पोन्नियिन सेल्वन 1चा बॉक्स ऑफिसवर धमाका; बॉलिवूडच्या विक्रम वेधाने केली निराशा
Hrithik and aishwarya
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 04, 2022 | 2:55 PM

मुंबई- मणिरत्नम दिग्दर्शित ‘पोन्नियिन सेल्वन 1’ (Ponniyin Selvan 1) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर (Box Office) धुमाकूळ घातला आहे. अवघ्या तीन दिवसांत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 100 कोटींचा आकडा पार केला आहे. 30 सप्टेंबर रोजी हा बिग बजेट चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. याच दिवशी हृतिक रोशन आणि सैफ अली खान यांचा ‘विक्रम वेधा’ (Vikram Vedha) प्रदर्शित झाला. पहिल्या चार दिवसांतील कमाईचा आकडा पाहचा ‘पीएस 1’ हा चित्रपट ‘विक्रम वेधा’च्या तुलनेत खूप पुढे गेला आहे. ऐश्वर्याच्या या चित्रपटाने हृतिकच्या चित्रपटाला चांगलीच मात दिली आहे.

पहिल्या चार दिवसांत पोन्नियिन सेल्वन 1 या चित्रपटाने कमाईचा 200 कोटींचा आकडा पार केला आहे. तगडी कमाई करणारा हा तमिळ चित्रपटसृष्टीतील पहिला चित्रपट ठरला आहे. जगभरात पीएस- 1 ने तीन दिवसांत तब्बल 230 कोटींचा गल्ला जमवला आहे.

हृतिक रोशन आणि सैफ अली खान यांच्या ‘विक्रम वेधा’च्या कमाईची गती दिवसेंदिवस कमी होताना दिसतेय. सोमवारी या चित्रपटाच्या कमाईत 45 टक्क्यांनी घट झाली. पहिल्या वीकेंडला ठिकठाक कमाई करणाऱ्या या चित्रपटाचा सोमवारी 50 कोटींच्या क्लबमध्ये दाखल होणं कठीण झालं. मात्र भारताबाहेर ‘विक्रम वेधा’ची कमाई चांगली होताना दिसतेय.

जगभरात या चित्रपटाने जवळपास 65 कोटींचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे जगभरातील कमाईचा आकडा पाहता हा चित्रपट 100 कोटींच्या क्लबमध्ये सहभागी होऊ शकतो.

विक्रम वेधाची कमाई-

पहिला दिवस- 10.05 कोटी रुपये
दुसरा दिवस- 12.05 कोटी रुपये
तिसरा दिवस- 14.05 कोटी रुपये
चौथा दिवस- 5.05 कोटी रुपये
भारतातील चार दिवसांची कमाई- 43 कोटी रुपये

पोन्नियिन सेल्वन 1 या चित्रपटाची सुरुवातच धमाकेदार झाली आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने भारतात 36.50 कोटींचा गल्ला जमवला. आता चौथ्या दिवशी या चित्रपटाची कमाई 25 ते 30 कोटींदरम्यान पोहोचली आहे.