लक्षात ठेव, आधीच तुझ्या आयुष्यात..; कपिल शर्माला अजय देवगणने सुनावलं, बोलतीच केली बंद!
अभिनेता अजय देवगण नुकताच कॉमेडियन कपिल शर्माच्या शोमध्ये पोहोचला होता. यावेळी कपिलने अजय देवगणवर गोव्याच्या फेणीवरून विनोद केला. मात्र अजयनेही त्याचं उत्तर असं दिलं, जे ऐकून एकच हशा पिकला.

अभिनेता अजय देवगण त्याच्या मिश्किल आणि थेट उत्तरांसाठी ओळखला जातो. याचीच झलक पुन्हा एकदा ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये पाहायला मिळाली. अजय देवगण त्याच्या आगामी ‘दृश्यम: द कन्क्लुजन’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कपिल शर्माच्या शोमध्ये पोहोचला होता. यावेळी कपिलने अजयच्या गोवासोबतच्या कनेक्शनवरून मस्करी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अजयने असा पलटवार केला की संपूर्ण संभाषणाची दिशाच बदलली. कपिल शर्माने अजयच्या अनेक लोकप्रिय चित्रपटांचा संदर्भ देत गोव्याचा विषय काढला. ‘गोलमाल’, ‘सिंघम’ आणि ‘दृश्यम’ यांसारख्या चित्रपटांमध्येही गोव्याची पार्श्वभूमी दिसली. शिवाय ‘दृश्यम: द कन्क्लुजन’चा ट्रेलरही गोव्यात लॉन्च करण्यात आला होता.
यावरून कपिलने अजय देवगणला मिश्किलपणे विचारलं की, त्याला गोवा खरंच आवडतो की तिथली फेणी आणि स्वस्त पापलेट त्याला तिकडे खेचून नेतं? कपिलच्या या प्रश्नावर अजयने शांतपणे उत्तर देत, गोवा त्याला अत्यंत आरामदायी वाटतो आणि मी फेणी पीत नसल्याचं सांगितलं.
कपिलला अजयचं प्रत्युत्तर
तू फेणी स्वतःसाठी नाही, तर दुसऱ्यांसाठी तरी आणू शकतो, असं म्हणत कपिलने अजयची पुन्हा मस्करी केली. यानंतर अजयने कपिलच्या जुन्या अनुभवांचा संदर्भ देत त्याच्यावरच विनोद केला. अजयने कपिलला उद्देशून म्हटलं की, “फेणीने आधीच तुझ्या आयुष्यात बराच गोंधळ निर्माण केला आहे, हे लक्षात ठेव.” अजयच्या या टोमण्यावर एकच हशा पिकला. त्यानंतर कपिल हसत, मीसुद्धा फेणी पीत नसल्याचं स्पष्ट केलं. त्यानंतर अर्चना पुरण सिंह यांनीही या संभाषणात उडी घेत मजा आणखी वाढवली.
पहा व्हिडीओ-
View this post on Instagram
अजयचा हा विनोद कपिल शर्माने यापूर्वी सार्वजनिकपणे सांगितलेल्या त्याच्या आयुष्यातील एका टप्प्याशी संबंधित होता. कपिलने त्याच्या ‘I’m Not Done Yet’ या स्टँड-अप स्पेशलमध्ये मद्यपानाच्या काळाबद्दल आणि त्या काळात सोशल मीडियावर केलेल्या काही पोस्टबद्दल सांगितलं होतं. त्यामुळे अजयच्या फेणीवरील टिप्पणीचा संदर्भ केवळ शोमधील मस्करीपुरता मर्यादित राहिला नाही. कपिलच्या जुन्या वक्तव्यामुळे या विनोदाकडे प्रेक्षकांचंही लक्ष गेलं.
दरम्यान, शोमध्ये अजय आणि कपिल यांच्यातील ही धमाल सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. कपिलने केलेल्या साध्या विनोदाला अजयने आपल्या खास अंदाजात दिलेलं उत्तर पाहून चाहत्यांना पुन्हा एकदा त्याच्या विनोदबुद्धीची झलक पाहायला मिळाली.
फेणी म्हणजे काय?
फेणी हे गोव्यात प्रसिद्ध असलेलं पारंपरिक मद्य आहे. काजूच्या फळांपासून तयार होणारी काजू फेणी आणि नारळाच्या रसापासून बनणारी नारळाची फेणी असे त्याचे प्रमुख प्रकार आहेत. काजू फेणीला गोव्याच्या खाद्य आणि सांस्कृतिक परंपरेत विशेष स्थान आहे.
