Akshay Kumar | ‘मोदी भक्त’चा टॅग देणाऱ्यांना अक्षय कुमारचं सडेतोड उत्तर; म्हणाला..

| Updated on: Oct 10, 2023 | 3:26 PM

अभिनेता अक्षय कुमारला 'मोदी भक्त'चा टॅग देण्यात आला. याविषयी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने मौन सोडलं. त्याचसोबत अक्षय इतर मुद्द्यांवरही मोकळेपणे व्यक्त झाला. 2019 च्या निवडणुकांआधी घेतलेल्या नरेंद्र मोदींच्या मुलाखतीविषयीही त्याने प्रतिक्रिया दिली.

Akshay Kumar | मोदी भक्तचा टॅग देणाऱ्यांना अक्षय कुमारचं सडेतोड उत्तर; म्हणाला..
PM Modi and Akshay Kumar
Image Credit source: Twitter
Follow us on

मुंबई | 10 ऑक्टोबर 2023 : 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी अक्षय कुमारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक मुलाखत घेतली होती. ही मुलाखत आणि त्यात विचारण्यात आलेले प्रश्न यावरून काहींनी अक्षयला ट्रोल केलं. आता त्याविषयी अक्षयने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मौन सोडलं आहे. “कोणालाही ती संधी दिली असती तर त्यांनी ती स्वीकारली असती”, असं तो म्हणाला. या मुलाखतीत अक्षयने त्याला देण्यात आलेल्या ‘मोदी भक्त’ या टॅगविषयीही मोकळेपणे प्रतिक्रिया दिली. त्याचप्रमाणे एकाच प्रकारचे चित्रपट करत असल्याच्या आरोपांवरही स्पष्टीकरण दिलं.

मोदींच्या मुलाखतीचे प्रश्न

‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत अक्षय म्हणाला, “लोकांना त्या मुलाखतीबद्दल समस्या होती. मला त्यांची माणुसकीची बाजू जाणून घ्यायची होती. म्हणून मी त्यांना आंब्यांचा प्रश्न विचारला होता. ते घड्याळ उलटं का बांधतात, त्यांच्या बँक अकाऊंटमध्ये किती पैसे आहेत, हे सर्व मला जाणून घ्यायचं होतं. मी त्यांना योजनांबद्दल विचारणार नव्हतो. त्याचप्रमाणे प्रश्नांबद्दल मला पंतप्रधान कार्यालयातून कोणतेच निर्देश मिळाले नव्हते. मला संपूर्ण स्वातंत्र्य देण्यात आलं होतं. आंब्यांविषयी प्रश्न विचारण्याची परवानगी त्यांनी मला दिली असती का? माझ्या हातात कोणता पेपरसुद्धा नव्हता. मी त्यांना एक विनोदसुद्धा सांगितला होता.”

‘मोदी भक्त’ टॅगवर प्रतिक्रिया

‘टाइम्स नाऊ’ला दिलेल्या आणखी एका मुलाखतीत ‘मोदी भक्त’ असल्याच्या टॅगवर अक्षयची प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावर तो म्हणाला, “हे खरंय, काही लोक मला ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ या चित्रपटातून स्वच्छ भारत अभियानाची प्रसिद्धी केल्याचं म्हणतात. मी पॅडमॅनसारखा चित्रपटसुद्धा बनवला आहे. पण त्याकडे कोणी पाहणार नाही. माझा एअरलिफ्ट हा चित्रपट काँग्रेसच्या काळाची पार्श्वभूमी असलेला आहे. आताचा मिशन रानीगंज हा चित्रपटसुद्धा काँग्रेसच्या काळाचाच आहे. मात्र कोणीच त्याबद्दल बोलत नाही. ते फक्त अशाच गोष्टी बोलतात, जे त्यांच्या दृष्टीने सोयीस्कर असतं.”

हे सुद्धा वाचा

अक्षय कुमारचा ‘मिशन रानीगंज’ हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. गेल्या चार दिवसांत या चित्रपटाने 15 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटाने अपेक्षित अशी कामगिरी केलं नसल्याचं त्याने मान्य केलं. मात्र मिशन रानीगंज हा चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या ब्लॉकबस्टर बनावा या हेतूने बनवलाच नव्हता, असंही त्याने स्पष्ट केलं.