
झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘लक्ष्मी निवास’मध्ये भावनाची भूमिका साकारणारी अभिनेत्री अक्षया देवधर सध्या तिच्या कारकिर्दीच्या उत्तम टप्प्यावर आहे. मेहनत, सकारात्मकता आणि सातत्याच्या जोरावर तिने पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे. 2025 या वर्षाने तिला काय शिकवलं, तिच्यासाठी हे वर्ष का खास ठरलं आणि नवीन वर्ष ती कसं साजरं करणार आहे, याविषयी अक्षयाने मनमोकळेपणाने आपले विचार शेअर केले. “माझ्यासाठी सुरुवातीपासूनच 2025 हे वर्ष खास ठरलं. ‘लक्ष्मी निवास’ या मालिकेसोबत वर्षाची सुरुवात झाली आणि अगदी पहिल्याच दिवसापासून वर्षाने धमाल केली. भरपूर चांगलं काम, सातत्याने मेहनत, सकारात्मक वातावरण आणि नवी ऊर्जा हे सगळं 2025 च्या सुरुवातीपासूनच माझ्या आयुष्यात होतं,” असं अक्षया म्हणाली.
सरत्या वर्षाने काय काय दिलं याविषयी सांगताना अक्षया पुढे म्हणाली, “या वर्षाने मला पुन्हा एकदा स्वतःला प्रेक्षकांसमोर सादर केलं. कम्फर्ट झोनमधून बाहेर पडून नवीन लोकांसोबत काम करणं, नव्या नात्यांची बांधणी करणं आणि पुन्हा एकदा झी मराठीशी जोडलं जाणं, हे सगळं या वर्षांनी दिलं, असं मी मनापासून म्हणेन. 2025 मधील माझी सर्वात सुंदर आठवण म्हणजे झी मराठी पुरस्कार सोहळा. जेव्हा तुम्ही चांगलं काम करता, तेव्हा झी मराठी मनापासून कौतुक करतं. 2025 मध्ये माझ्या घरी 4 झी मराठी अवॉर्ड्स आले आणि त्यामुळे हे वर्ष माझ्यासाठी आणखी खास ठरलं. वैयक्तिक आयुष्याबाबत बोलायचं झालं, तर 2025 च्या सुरुवातीलाच शूटिंगसोबत योगा, वर्कआउट आणि ध्यान यांची सवय लावायचा माझा विचार होता. मानसिक आरोग्यासाठी हे सगळं खूप महत्त्वाचं आहे, हे मला ठाऊक होतं. मात्र ते शक्य झालं नाही. तरीही मी निराश नाही, हा संकल्प मी 2026 मध्ये नक्की पूर्ण करणार आहे. 2025 ला माझा संदेश खूप सकारात्मक आहे. या वर्षाने मला भरपूर काम दिलं, प्रेक्षकांचं प्रेम आणि पुन्हा एकदा लोकप्रियता दिली. आता मी थांबणार नाही, सातत्याने काम करत राहणार आहे.”
2025 ने मला पुन्हा एकदा माझ्या पायावर उभं केलं त्यासाठी मनापासून धन्यवाद. 2025 च्या शेवटच्या दिवशीही मी शूटिंगमध्ये व्यस्त असणार आहे. मात्र 1 जानेवारी 2026 ला सुट्टी मिळाली, तर नेहमीप्रमाणे माझा नवीन वर्षाचा पहिला दिवस मी कुटुंबीयांसोबत आणि हार्दिकसोबत घालवणार आहे, असंही तिने सांगितलं.