Alia Bhatt | ‘ती मर्यादा तुम्ही ओलांडू शकत नाही..’; टेरेसवरील ‘त्या’ दोन व्यक्तींना पाहून आलियाचा राग अनावर

आलिया तिच्या लिव्हिंग रुममध्ये निवांत बसली होती, तेव्हा तिला समोरच्या इमारतीवरील टेरेसवर दोन जण कॅमेरे घेऊन डोकावत असल्याचं दिसलं. या घटनेनं तिचा तीव्र संताप झाला आणि सोशल मीडियावर पोस्ट लिहित तिने राग व्यक्त केला.

Alia Bhatt | ती मर्यादा तुम्ही ओलांडू शकत नाही..; टेरेसवरील त्या दोन व्यक्तींना पाहून आलियाचा राग अनावर
Image Credit source: Instagram
| Updated on: Feb 22, 2023 | 8:29 AM

मुंबई : गेल्या काही वर्षांपासून ‘पापाराझी कल्चर’ फार वाढल्याचं दिसून येत आहे. एअरपोर्ट असो, सलून असो किंवा मग एखादं हॉटेल.. सेलिब्रिटींना विविध ठिकाणी पापाराझींकडून घेरलं जातं आणि त्यांचे फोटो, व्हिडीओ क्लिक केले जातात. मात्र ही हद्द तेव्हा पार झाली, जेव्हा अभिनेत्री आलिया भट्टने तिच्या घरासमोरील इमारतीच्या टेरेसवर दोन जणांना हातात कॅमेरा घेऊन असल्याचं पाहिलं. आलिया तिच्या लिव्हिंग रुममध्ये निवांत बसली होती, तेव्हा तिला समोरच्या इमारतीवरील टेरेसवर दोन जण कॅमेरे घेऊन डोकावत असल्याचं दिसलं. या घटनेनं तिचा तीव्र संताप झाला आणि सोशल मीडियावर पोस्ट लिहित तिने राग व्यक्त केला.

माध्यमांनी पोस्ट केलेल्या फोटोंना टॅग करत आलियाने लिहिलं, ‘तुम्ही मस्करी करताय का? मी माझ्या लिव्हिंग रुममध्ये दुपारी निवांत बसले होते आणि तेव्हा मला जाणवलं की कोणीतरी मला पाहतंय. मी उठून पाहिलं तर समोरच्या इमारतीच्या टेरेसवरून दोन व्यक्ती माझ्याकडे कॅमेरा लावून पाहत होते. कोणत्या जगात हे असं करणं योग्य आहे?’

आलिया भट्टची पोस्ट-

‘एखाद्याच्या खासगी आयुष्यात डोकावण्याची ही सर्वांत वाईट गोष्ट आहे. एक अशी मर्यादा असते, जी तुम्ही ओलांडू शकत नाही. आज मला हे म्हणावं लागतंय की सर्व मर्यादा ओलांडल्या गेल्या आहेत’, असं लिहित तिने या पोस्टमध्ये मुंबई पोलिसांनाही टॅग केलं आहे. आलियाच्या या पोस्टवर सर्वसामान्यांशिवाय बॉलिवूडमधील इतर सेलिब्रिटींनीही प्रतिक्रिया देत राग व्यक्त केला.

आलियाला नुकतंच दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘गंगुबाई काठियावाडी’ या चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. या पुरस्कार सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेत्री रेखा आणि आलियामधील खास बाँडींग पहायला मिळाली. तर आलियाचा पती आणि अभिनेता रणबीर कपूरला ‘ब्रह्मास्त्र: पार्ट 1’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.

आलिया लवकरच करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये ती रणवीर सिंगसोबत भूमिका साकारणार आहे. याशिवाय तिचा पहिलावहिला हॉलिवूड चित्रपटसुद्धा लवकरच प्रदर्शित होणार आहे. ‘हार्ट ऑफ स्टोन’ असं तिच्या या चित्रपटाचं नाव असून यामध्ये तिने गल गडॉटसोबत काम केलं आहे.