‘राजा शिवाजी’ चित्रपटाबाबत शिवसेना नेत्याचं मुख्यमंत्र्यांना पत्र, केली मोठी मागणी
Raja Shivaji : गेल्या काही दिवसांपासून राजा शिवाजी चित्रपटाची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. अशातच आता शिवसेना नेत्याने हा चित्रपट टॅक्श फ्री करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Raja Shivaji : 1 मे रोजी प्रदर्शित झालेल्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात कमाई करताना दिसत आहे. चित्रपटाला देखील प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. अशातच आता शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी ‘राजा शिवाजी’ चित्रपटाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक अभिनेता रितेश देशमुखने केले असून, तो महाराष्ट्रात करमुक्त करण्यात यावा अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केली आहे.
अंबादास दानवे यांनी आपल्या पत्रात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा आणि विचारांचा प्रभावी उल्लेख केला आहे. ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट केवळ मनोरंजनापुरता मर्यादित नसून तो इतिहासाची जाणीव करून देणारा आणि प्रेरणा देणारा आहे असे त्यांनी नमूद केले. या चित्रपटातून महाराजांचे शौर्य, दूरदृष्टी, लोकाभिमुख प्रशासन आणि युद्धनीतीतील कौशल्य यांचे प्रभावी चित्रण करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. विशेषतः गनिमी काव्याच्या तंत्राचा वापर आणि सुयोग्य राज्यकारभार यावरही प्रकाश टाकण्यात आला आहे.
करमुक्तीची गरज का?
आजच्या तरुण पिढीला आपल्या इतिहासाची ओळख व्हावी आणि त्यातून प्रेरणा मिळावी, यासाठी अशा प्रकारचे चित्रपट अत्यंत महत्त्वाचे ठरतात असे अंबादास दानवे यांनी स्पष्ट केले. देशभक्ती, स्वाभिमान आणि समाजासाठी योगदान देण्याची भावना या चित्रपटातून रुजवली जाऊ शकते असा त्यांचा विश्वास आहे.
महाराष्ट्राच्या समृद्ध इतिहासाचा आणि संस्कृतीचा प्रचार-प्रसार करण्यासाठी चित्रपट हे प्रभावी माध्यम ठरू शकते. त्यामुळे ‘राजा शिवाजी’ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी शासनाने पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
सकारात्मक निर्णयाची अपेक्षा
जर हा चित्रपट करमुक्त केला गेला तर विद्यार्थी तसेच सर्वसामान्य नागरिकांना तो सहजपणे पाहता येईल. यामुळे चित्रपटाचा संदेश मोठ्या प्रमाणावर लोकांपर्यंत पोहोचेल आणि समाजावर सकारात्मक परिणाम होईल असेही त्यांनी म्हटले आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर, राज्य सरकारने सकारात्मक निर्णय घेऊन ‘राजा शिवाजी’ चित्रपटाला करमुक्ती द्यावी अशी अपेक्षा अंबादास दानवे यांनी व्यक्त केली आहे. सध्या त्यांच्या या मागणीची राजकीय व सामाजिक स्तरावर चर्चा सुरू झाली आहे.