90 कोटींचं कर्ज तरीही नाकारलेली अंबानींची मदत; अमिताभ बच्चन यांच्या सर्वांत वाईट काळातील सत्य

अमिताभ बच्चन यांची संपत्ती-प्रसिद्धी पाहून कधीकाळी त्यांनीसुद्धा आर्थिक तंगीचा सामना केला असेल, यावर विश्वास बसत नाही. परंतु बिग बींनीही त्यांच्या आयुष्यात असा कठीण काळ पाहिला आहे. त्यावेळी ते कोट्यवधी रुपयांच्या कर्जात बुडाले होते.

90 कोटींचं कर्ज तरीही नाकारलेली अंबानींची मदत; अमिताभ बच्चन यांच्या सर्वांत वाईट काळातील सत्य
अमिताभ बच्चन
| Updated on: Dec 31, 2025 | 1:01 PM

एका फ्लॉप स्टारपासून बॉलिवूडचा ‘शहंशाह’ होण्यापर्यंतचा प्रवास करणाऱ्या अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक चढ-उतार पाहिले. गेल्या पाच दशकांहून अधिक काळापासून विविध भूमिका साकारून प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या बिग बींच्या आयुष्यात एक काळ असाही होता, जेव्हा त्यांच्यावर 90 कोटी रुपयांचं कर्ज होतं. 1990 च्या दशकाचा शेवट आणि 2000 च्या सुरुवातीला हे सर्व घडलं होतं. लेखक रुमी जाफरी यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत याविषयीचा खुलासा केला. त्यावेळी त्यांनी धीरुभाई अंबानी यांचीही मदत घेण्यास नकार दिला होता. त्या काळात त्यांनी प्रत्येक आव्हानाचा सामना केला होता. स्वाभिमान, प्रामाणिकपणा आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी सर्वकाही परत मिळवलं होतं.

अमिताभ बच्चन यांच्या करिअरमध्ये एक काळ असा होता, जेव्हा त्यांचा प्रत्येक चित्रपट अपयशी ठरत होता आणि त्यांचा ABCL सुद्धा तोट्यात जात होता. तरीही बिग बींनी मदतीसाठी कोणापुढे हात पसरले नव्हते. प्रसिद्ध पटकथालेखक आणि दिग्दर्शक रुमी जाफरी यांनी ‘जर्नी अनस्क्रिप्टेड विथ चंदा’मध्ये अमिताभ बच्चन यांच्या आयुष्यातील या टप्प्याबद्दल सांगितलं. ते म्हणाले, “मी पूर्ण आत्मविश्वासाने सांगू शकतो की एबीसील तोट्यात असतानाही अमिताभ बच्चन यांनी कोणाकडेही आर्थिक मदत मागितली नव्हती.”

याविषयी त्यांनी पुढे सांगितलं, “मला आठवतंय की त्यांनी त्यांच्या कष्टाचे पैसे संजीव गुप्ता यांना दिले होते, जे त्यावेळी एबीसीएलचे सीईओ होते. कंपनी स्थापन करण्यासाठी त्यांनी मोठी रक्कम दिली होती. कॉर्पोरेट प्रॉडक्शन कंपनी पाहण्याची ही माझी पहिलीच वेळ होती. त्यांनी सचिन पिळगांवकर आणि जॉय ऑगस्टीन यांना निर्माते म्हणून आणि मला लेखक म्हणून त्यांच्या कंपनीत सामील केलं होतं.”

“बिग बी खरंच फायटर आहेत. कौन बनेगा करोडपती या शोमधून आणि चित्रपटांमधून जो काही पैसा त्यांनी कमावला होता, त्यातून त्यांनी ते सर्व कर्ज फेडलं होतं. ते खूप प्रामाणिक आहेत. जेव्हा धीरुभाई अंबानी यांना अमिताभ बच्चन यांच्या परिस्थितीबद्दल समजलं होतं, तेव्हा त्यांनी कोणालाही न विचारता, न कळू देता त्यांचा धाकटा मुलगा अनिल अंबानी यांना बिग बींची आर्थिक मदत करण्याचं सांगितलं होतं. अमिताभ बच्चन यांनी त्या क्षणी ते पैसे स्वीकारले असते, तर त्यांच्या समस्यांचं निराकरण झालं असतं. परंतु त्यांनी तसं केलं नाही”, असा किस्सा रुमी जाफरी यांनी सांगितला.

अमिताभ बच्चन यांचा हा स्वभाव पाहून धीरुभाई अंबानीसुद्धा त्यांच्यावर प्रभावित झाले होते. “खाली पडल्यानंतर ते स्वत:च्या बळावर पुन्हा उभे राहिले, मी त्यांचा आदर करतो”, अशा शब्दांत त्यांनी बिग बींचं कौतुक केलं होतं.