Anirudh Ravichander : शुभमंगल सावधान! अनिरुद्ध-काव्या मारनच्या लग्नाचा पहिला फोटो समोर! लग्नमंडप जणू दुसरा स्वर्गच!
Anirudh Ravichander and Kavya Maran Wedding : अनिरुद्ध रविचंदर आणि काव्या मारन यांनी ग्रीसमध्ये लग्नगाठ बांधली असून त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

प्रसिद्ध संगीतकार अनिरुद्ध रविचंदर आणि सनरायझर्स हैदराबादची सहमालक काव्या मारन अखेर विवाहबंधनात अडकले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं होतं. अखेर 11 नोव्हेंबर रोजी ग्रीसमध्ये या दोघांचा शाही विवाहसोहळा पार पडला. अनिरुद्धने स्वतः सोशल मीडियावर लग्नाचे खास फोटो शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे.
अनिरुद्धने शेअर केले लग्नाचे खास फोटो
अनिरुद्ध रविचंदरने इन्स्टाग्रामवर लग्नसोहळ्यातील काही खास क्षणांचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंसोबत त्यानं, ‘माझ्या आयुष्यातील एकमेव आणि आयुष्यभरासाठीचा क्षण… 11.11’ असं कॅप्शन लिहिलं आहे. त्याच्या या पोस्टनंतर चाहत्यांकडून आणि मनोरंजनविश्वातील कलाकारांकडून नवदाम्पत्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
ग्रीसमध्ये पार पडला शाही विवाहसोहळा
अनिरुद्ध आणि काव्या यांचा विवाहसोहळा ग्रीसमध्ये अत्यंत खासगी आणि आलिशान पद्धतीनं आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला कुटुंबीय, जवळचे मित्र आणि मनोरंजन तसेच राजकीय क्षेत्रातील काही दिग्गज उपस्थित होते. सुपरस्टार रजनीकांत आणि तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचीही या विवाहसोहळ्याच्या निमित्तानं उपस्थिती असल्याची माहिती समोर आली आहे.
२१ नोव्हेंबरला चेन्नईमध्ये होणार भव्य रिसेप्शन
ग्रीसमध्ये विवाहसोहळा पार पडल्यानंतर आता चेन्नईमध्ये भव्य रिसेप्शनचं आयोजन करण्यात येणार आहे. २१ नोव्हेंबर रोजी हा सोहळा पार पडणार असल्याची माहिती आहे. या रिसेप्शनसाठी राजकीय, क्रीडा आणि चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गजांना निमंत्रण देण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे या सोहळ्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
कोण आहे काव्या मारन?
काव्या मारन ही प्रसिद्ध उद्योगपती कलानिधी मारन यांची मुलगी आहे. ती सन टीव्ही नेटवर्कच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर असून आयपीएलमधील सनरायझर्स हैदराबाद संघामध्येही महत्त्वाची भूमिका बजावते.
अनिरुद्धने संगीतविश्वात निर्माण केली वेगळी ओळख
अनिरुद्ध रविचंदर हा दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय संगीतकार आहे. ‘व्हाय दिस कोलावेरी डी’ या गाण्यामुळे तो रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आला. त्यानंतर ‘विक्रम’, ‘जेलर’, ‘लिओ’, ‘मास्टर’, ‘कथ्थी’ आणि ‘कुली’ यांसारख्या चित्रपटांना त्याने संगीत दिलं आहे. आपल्या वेगळ्या संगीतशैलीमुळे त्याने अल्पावधीतच मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे.
दरम्यान, अनिरुद्ध आणि काव्या यांच्या नात्याबद्दल गेल्या काही वर्षांपासून चर्चा सुरू होत्या. मात्र, दोघांनीही आपल्या नात्याबद्दल सार्वजनिकरीत्या फारसं भाष्य केलं नव्हतं. आता थेट लग्नाचे फोटो शेअर करत या दोघांनी आपल्या आयुष्यातील नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे.