90 च्या दशकातील प्रेमाची आठवण करून देणारं गाणं, कितीही वेळा ऐकलं तरी भरत नाही मन
90 च्या दशकातील प्रेमाची आठवण करून देणारं गाणं. 37 वर्षांपासून प्रचंड लोकप्रिय. लता मंगेशकर यांच्या आवाजामुळे ठरलेलं प्रचंड सुपरहिट. आजही त्याच गाण्याचे आहेत लाखो चाहते.

आजच्या डिजिटल युगात प्रेम व्यक्त करण्यासाठी व्हॉट्सॲप, मोबाइल मेसेज आणि व्हिडिओ कॉल असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मात्र, एक काळ असा होता, जेव्हा प्रेमाचा संदेश पोहोचवण्यासाठी पत्रांची आणि निरोपांची मदत घेतली जायची. हिंदी चित्रपटसृष्टीनेही या जुन्या रोमँटिक कल्पनेला आपल्या गाण्यांमधून सुंदर पद्धतीने मांडलं. 1989 मध्ये प्रदर्शित झालेल्या सलमान खान आणि भाग्यश्री यांच्या ‘मैंने प्यार किया’ या चित्रपटातील ‘कबूतर जा जा जा’ हे गाणं याचं उत्तम उदाहरण आहे.
‘कबूतर जा जा जा’ या गाण्यात अभिनेत्री भाग्यश्री आपल्या मनातील भावना कबुतराच्या माध्यमातून सलमान खानपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. प्रेमाचा निरोप पोहोचवण्यासाठी कबुतराचा वापर करण्याची ही कल्पना प्रेक्षकांना विशेष भावली होती.
त्या काळातील प्रेमाची भावना, प्रिय व्यक्तीला भेटण्याची ओढ, पत्रांची प्रतीक्षा आणि मनातील भावना व्यक्त करण्याची धडपड या गाण्यातून पाहायला मिळते. आजच्या काळात मोबाइलवर काही सेकंदांत संदेश पोहोचतो; मात्र त्या काळातील प्रेमात असलेला निरागसपणा या गाण्यातून अनुभवायला मिळतो. त्यामुळेच हे गाणं आजही जुन्या हिंदी चित्रपटगीतांच्या चाहत्यांच्या लक्षात आहे.
लता मंगेशकर आणि एस. पी. बालसुब्रह्मण्यम यांचा आवाज
‘कबूतर जा जा जा’ हे गाणं दिग्गज गायिका लता मंगेशकर आणि एस. पी. बालसुब्रह्मण्यम यांनी गायलं होतं. या गाण्याला रामलक्ष्मण यांनी संगीत दिलं, तर देव कोहली यांनी त्याचे बोल लिहिले होते. या गाण्यातील संगीत, शब्द आणि गायकांचा आवाज यांचा सुंदर मेळ पाहायला मिळतो.
2.25 कोटींचं बजेट, जगभरात 40 कोटींपेक्षा जास्त कमाई
‘मैंने प्यार किया’ हा हिंदी चित्रपटसृष्टीतील मोठ्या ब्लॉकबस्टर चित्रपटांपैकी एक मानला जातो. या चित्रपटाचं बजेट जवळपास 2.25 कोटी रुपये होतं. त्याने भारतीय बॉक्स ऑफिसवर सुमारे 19.58 कोटी रुपये नेट कमाई केली होती. तर जगभरातील एकूण ग्रॉस कमाई जवळपास 40.65 कोटी रुपये होती.
या चित्रपटाने सलमान खानच्या कारकिर्दीला मोठी दिशा दिली. ‘प्रेम’ या भूमिकेमुळे सलमान खान रातोरात लोकप्रिय झाला आणि त्याच्या अभिनय कारकिर्दीतील हा एक महत्त्वाचा टप्पा ठरला. आज अनेक वर्षांनंतरही ‘कबूतर जा जा जा’ हे गाणं ऐकलं की जुन्या काळातील निरागस प्रेमाची आठवण होते.
