मोठी बातमी! विरोधी पक्षांना सर्वात मोठा धक्का, या राज्यात निवडणुकीपूर्वीच 77 जागांवर भाजपचे उमेदवार विजयी
2027 मध्ये सात राज्यांमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. मात्र या निवडणुकीपूर्वीच मोठी बातमी समोर आली आहे. भाजपाचा मोठा विजय झाला आहे. 77 जागांवर भाजपच्या उमेदवारांचा बिनविरोध विजय झाला आहे.

देशात आता लवकरच विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू होणार आहे, पुढच्या वर्षात सात राज्यांमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. ज्यामध्ये गोवा, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, गुजरात, या राज्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. दरम्यान या निवडणुकीपूर्वी एक मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे भाजपला मोठं यश मिळालं आहे. भाजपाने निवडणुकीपूर्वीच मैदान मारलं आहे. त्रिपुरामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, या निवडणुकांपूर्वीच 77 जागांवर भाजपच्या उमेदवारांचा विजय झाला आहे. राज्यात 345 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागांसाठी निवडणुका होणार आहेत, त्यापैकी 77 जागांवर भाजपचे उमेदवार मतदानापूर्वीच विजयी झाले आहेत. म्हणजे आता या जागांवर निवडणूकच होणार नाहीये.
मात्र दुसरीकडे भाजपचे 77 उमेदवार विजयी होताच आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे. हा त्रिपुरामधील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या सीपीआय (एम) साठी मोठा धक्का मानला जात आहे. आमच्या उमेदवारांना धमक्या देऊन उमेदवारी अर्ज मागे घेण्यास भाग पाडण्यात आलं, असा आरोप सीपीआय एम ने भाजपवर केला आहे. तर निवडणूक आयोगाने विरोधी पक्षाचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत, असा कोणताही प्रकार घडला नसल्याचं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे.
राज्यात 21 शहरांमध्ये स्थानिक स्वाराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, ज्यामध्ये एकूण 345 जागा आहेत. मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 77 मतदारसंघात प्रतिस्पर्धी उमेदवारच उरला नसल्याने भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. यामध्ये मोहननपूर, कमालपूर, जिरनिया, रानीरबाजार, आणि शांतीरबाजार या मतदारसंघाचा समावेश आहे. 2018 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये पहिल्यांदा या राज्यात भाजपने डाव्या पक्षांना पराभवाचा धक्का दिला होता. तेव्हापासून वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये इथे भाजपाची विजयी घोडदौड सुरूच आहे. या निवडणुकीमध्ये देखील 77 जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. मात्र यावरून आता त्रिपुरामध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षांकडून आरोपांना सुरुवात झाली आहे.
