
ज्येष्ठ अभिनेत्री आणि राज्यसभेच्या खासदार जया बच्चन त्यांच्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आल्या आहेत. संसदेच्या आवारात एका व्यक्तीने त्यांच्यासोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला असता जया बच्चन यांनी त्या व्यक्तीला धक्का दिला आणि त्याच्यावर ओरडल्या. त्यांच्या अशा वागण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून त्यावरून अनेकांकडून टीका केली जात आहे. सार्वजनिक ठिकाणी अशा पद्धतीन राग अनावर होण्याची जया बच्चन यांची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांना अनेकदा चिडल्याचं पाहिलं गेलंय. परंतु यावेळी त्यांनी हद्दच पार केल्याची भावना नेटकरी व्यक्त करत आहेत. अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौत, दिग्दर्शक अशोक पंडित यांनी त्यांची कडक शब्दांत निंदा केली. आता ‘अनुपमा’ मालिकेत भूमिका साकारणारी अभिनेत्री रुपाली गांगुलीने त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
नुकतीच रुपाली एका कार्यक्रमात सहभागी झाली होती. यादरम्यान पापाराझींनी तिला जया बच्चन यांच्या व्हिडीओबद्दल प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना रुपाली म्हणाली, “जयाजींना पाहून… मी माझ्या आईसोबत त्यांचा ‘कोरा कागज’ हा चित्रपट पाहिला होता, ज्यामध्ये वडिलांना राष्ट्रीय पुरस्कार मिळालं होतं. ‘कोरा कागज’मध्ये जयाजींचं अभिनय पाहून मी खरंतर अभिनय करायला शिकले. मला त्यांच्याकडून अशा वर्तनाची अपेक्षा नाही.”
#WATCH | Delhi: Samajwadi Party MP Jaya Bachchan scolded a man and pushed him away, while he was trying to take a selfie with her. pic.twitter.com/UxIxwrXSM0
— ANI (@ANI) August 12, 2025
अभिनेत्री कंगना राणौत यांनीसुद्धा जया बच्चन यांच्या व्हिडीओवर टीका केली. ‘सर्वाधिक बिघडलेली आणि विशेषाधिकार मिळवलेली महिला. लोक यांचे नखरे आणि बकवास यासाठी झेलतात कारण या अमिताभ बच्चन यांच्या पत्नी आहेत. ही समाजवादी पार्टीची टोपी त्यांच्या डोक्यावर कोंबडीच्या तुऱ्यासारखी दिसतेय. त्या स्वत: कोंबडीसारख्या दिसत आहेत. लज्जास्पद गोष्ट आहे ही,’ अशा शब्दांत तिने टोला लगावला होता.
मंगळवारी जया बच्चन त्यांच्या इतर सहकाऱ्यांसोबत कॉन्स्टिट्युशन क्लबच्या बाहेर उभ्या होत्या. तितक्यात एक व्यक्ती त्यांच्या बाजूला येऊन मोबाइलमध्ये त्यांच्यासोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न करतो. त्याला पाहून जया बच्चन लगेच धक्का देतात आणि ओरडतात, “हे काय करताय तुम्ही?” त्यानंतर तो व्यक्ती जया बच्चन यांची माफी मागतो.