Anurag Kashyap: ‘त्या’ घटनांमुळे डिप्रेशनचा केला सामना, हार्ट अटॅकही आला; अनुराग कश्यपचा खुलासा

अनुराग कश्यपला 3 वेळा रिहॅब सेंटरमध्ये जावं लागलं; मुलीला यायच्या बलात्काराच्या धमक्या

Anurag Kashyap: त्या घटनांमुळे डिप्रेशनचा केला सामना, हार्ट अटॅकही आला; अनुराग कश्यपचा खुलासा
Image Credit source: Forbes
| Updated on: Nov 27, 2022 | 2:00 PM

मुंबई: ‘गँग्स ऑफ वासेपूर’, ‘देव डी’, ‘अगली’ यांसारख्या चित्रपटांचा दिग्दर्शक अनुराग कश्यप याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नैराश्याबद्दल खुलासा केला. तीन वेळा रिहॅबमध्ये जावं लागल्याचंही त्याने सांगितलं. जवळपास तीन वर्षे अनुरागने नैराश्याचा सामना केला. अनुरागची मुलगी आलिया कश्यपला ज्यावेळी बलात्काराच्या धमक्या येत होत्या, त्यावेळी तिलासुद्धा वारंवार एंग्झायटी अटॅक्स येत होते, असा खुलासा त्याने केला. 2019 मध्ये अनुरागने ट्विटर अकाऊंट सोडल्यानंतर त्याच्या मुलीला नेटकऱ्यांकडून ट्रोल केलं जात होतं.

नैराश्याचा सामना करत असताना आणि आयुष्याच्या अत्यंत वाईट काळातून जात असतानाही मी काम करणं सोडून दिलं नाही, असं तो म्हणाला. सोशल मीडियावरील नकारात्मकतेमुळे ट्विटर अकाऊंट सोडल्याचं त्याने स्पष्ट केलं. आई-वडीलांना आणि मुलीला सतत धमक्या येत असल्याने त्याने 2019 मध्ये ट्विटर सोडण्याचा निर्णय घेतला होता.

अनुराग कश्यपने सीएएविरोधात आवाज उठवला होता आणि त्याविरोधातील आंदोलनात भाग घेण्यासाठी तो जामिया मिलिया इस्लामिया विद्यापिठात गेला होता. त्यानंतर जे काही घडलं त्याबद्दल सांगताना तो पुढे म्हणाला, “त्यावेळी माझ्या मुलीला सतत ट्रोल केलं जात होतं. तिला बलात्काराच्या धमक्या येत होत्या आणि या सर्व घटनांमुळे तिला एंग्झायटी अटॅक्स येऊ लागले होते. म्हणूनच ऑगस्ट 2019 मध्ये मी ट्विटरला रामराम केला.”

“मी लंडनमध्ये एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी गेलो होतो. तेव्हा जामिया मिलियाचं प्रकरण घडलं आणि मला भारतात परत यावं लागलं. आता माझ्याने हे सहन होणार नाही, कोणी काहीच बोलत नाहीये, असं मला वाटत होतं. मी पुन्हा ट्विटरवर बोलू लागतो”, असं अनुरागने सांगितलं.

गेल्या वर्षी हृदयविकाराचा झटका आल्याचंही त्याने या मुलाखतीत सांगितलं. त्यावेळी त्याच्यावर एंजियोप्लास्टी करण्यात आली. “परिस्थिती कोणतीही असली तरी इतरांसारखा मी बसून राहू शकत नाही. तेवढं आलिशान माझं आयुष्य नाही”, असं म्हणत त्याने कामाला सुरुवात केल्याचं सांगितलं.