तू माझ्या आयुष्यातली सर्वांत कुरूप..; पत्नीचा अपमान करत अभिनेत्याने सोडलं घर, दिग्गज अभिनेत्रीचा खुलासा

प्रसिद्ध अभिनेत्री अपरा मेहता या नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या खासगी आयुष्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाल्या. गेल्या अनेक वर्षांपासून त्या पतीपासून वेगळ्या राहत आहेत. तू माझ्या आयुष्यातील सर्वांत कुरूप महिला आहेत, असं त्यांच्या पतीने म्हणत घर सोडलं होतं.

तू माझ्या आयुष्यातली सर्वांत कुरूप..; पत्नीचा अपमान करत अभिनेत्याने सोडलं घर, दिग्गज अभिनेत्रीचा खुलासा
अपरा मेहता, दर्शन जरीवाला
Image Credit source: Instagram
| Updated on: Jul 25, 2026 | 12:56 PM

‘क्योंकी सास भी कभी बहू थी’, ‘जमाई राजा’ यांसारख्या मालिकांमधून घराघरात पोहोचलेल्या दिग्गज अभिनेत्री अपरा मेहता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाल्या आहेत. या मुलाखतीत त्यांनी पतीपासून वेगळं राहण्यामागच्या कारणाचा खुलासा केला आहे. अपरा आणि त्यांचे पती-अभिनेते दर्शन जरीवाला हे गेल्या दोन दशकांहून अधिक काळापासून वेगळे राहत आहेत. अपरा अमेरिकेत असताना त्यांच्या पतीने त्यांना फोन केला होता. लग्नाच्या वाढदिवशीच त्यांनी अत्यंत महत्त्वाचं बोलायचं आहे, असं म्हणत पत्नीला फोन केला होता. त्यानंतर जेव्हा त्या भारतात परतल्या, तेव्हा दर्शन यांनी विभक्त होण्याची इच्छा बोलून दाखवली होती.

लग्नाच्या वाढदिवशीच धक्का

‘हॉटरफ्लाय’ला दिलेल्या मुलाखतीत अपरा म्हणाल्या, “मी माझा शो संपवून अमेरिकेतून भारतात परतली होती. मी मध्यरात्री 3 वाजता विमानतळावर पोहोचली आणि तिथून घरी जायला मला 5 वाजले होते. त्याच्या दोन तासांतच म्हणजेच 7 वाजता माझी शिफ्ट होती. तेव्हा त्यांनी मला फक्त इतकंच म्हटलं होतं की, हे पहा अपरा.. आपण विभक्त होऊयात. कारण मी आता तुझ्यावर प्रेम करत नाही. मला आता तू आवडत नाहीस. तू माझ्या आयुष्यातील सर्वांत कुरूप महिला आहेस.”

पुन्हा स्वीकारण्यास आजही तयार

“सकाळी ते चहाचा कप घेऊन झोपाळ्यावर बसले होते आणि मी माझ्या शूटिंगसाठी निघाले होते. त्यादिवशी मला तीन मोठे सीन्स शूट करायचे होते. मी पहाटे 5 वाजताच अमेरिकेतून परत आले होते, त्यामुळे प्रत्येक टेकच्या मधे मला डुलक्या येत होत्या. झोप अनावर होत होती. नंतर जेव्हा मी शुद्धीवर आले, तेव्हा मला वाटलं की, दर्शन यांनी नेमकं काय म्हटलं होतं? त्यांचा कदाचित तसा अर्थ नसावा. पण एकेदिवशी ते घर सोडून निघून गेले. आमचा घटस्फोट झालेला नाही. पण आजही आमचे संबंध सौहार्दपूर्ण आहेत. माझ्या घराचे दरवाजे त्यांच्यासाठी नेहमीच खुले आहेत. हे अजूनही आमचंच घर आहे. ते परत येऊ शकतात. पण मला हेसुद्धा माहीत आहे की कदाचित ते परत येणार नाहीत. मी हेसुद्धा सांगते की, त्यांना माझ्यासारखं कोणी भेटणार नाही. मलाही त्यांच्यासारखं कोणी भेटणार नाही. जरी आम्ही वेगळे राहत असलो तरी आम्ही एकमेकांसोबत खूप सहज वावरतो”, अशा शब्दांत त्या व्यक्त झाल्या.

अपरा मेहता आणि दर्शन जरीवाला यांचं लग्न 1980 मध्ये झालं होतं. त्यानंतर 1981 मध्ये त्यांनी कुटुंबीयांच्या उपस्थितीत त्यांनी पुन्हा लग्नगाठ बांधली होती. या दोघांना खुशाली नावाची एक मुलगी आहे. अपरा आणि दर्शन यांचा घटस्फोट झाला नसला तरी 2003-2004 पासून ते वेगळे राहत आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us