Ashish Vidyarthi : उद्ध्वस्त झाल्यासारखं वाटलं…वयाच्या 55व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्यानं घेतला घटस्फोट, 60व्या वर्षी केलं दुसरं लग्न, सांगितला प्रसंग
Ashish Vidyarthi On Divorce : प्रसिद्ध अभिनेते आशिष विद्यार्थी यांनी वयाच्या 55व्या वर्षी घटस्फोट घेतला. तसेच 60व्या वर्षी दुसरं लग्न केलं. याबद्दल अभिनेत्यानं नुकत्याच एका मुलाखतीत सांगितलंय.

अभिनेता आशिष विद्यार्थी आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यांनी वयाच्या 60 व्या वर्षी रूपाली बरुआसोबत दुसरं लग्न केलं. या लग्नामुळे आशिष यांची बरीच चर्चा झाली होती. आता, आशिष यांनी त्यांच्या घटस्फोटाबद्दलही भाष्य केलं आहे. त्यांनी खुलासा केला आहे की, वयाच्या ५५ व्या वर्षी घटस्फोट घेतल्याबद्दल त्यांना टीकेला सामोरं जावं लागलं. त्यांनी या दुःखाचा सामना कसा केला याबद्दल नुकत्याच एका मुलाखतीत सांगितलंय.
आशिष यांनी सांगितला कठीण काळ
आशिष यांचं पहिलं लग्न राजोशी बरुआसोबत झालं होतं. राजोशी एक अभिनेत्री आणि गायिका आहे. या जोडप्याचं लग्न 24 वर्षे टिकलं आणि त्यांना अर्थ नावाचा एक मुलगा आहे. या जोडप्यानं आपला घटस्फोट खाजगी ठेवला होता. आशिष यांनी दुसरं लग्न केल्यानंतर त्यांच्या पहिल्या लग्नाची बातमी समोर आलेली. आशिष यांनी मे 2023 मध्ये दुसरं लग्न केलं. शुभंकर मिश्राला दिलेल्या मुलाखतीत आशिष आपल्या कठीण काळाबद्दल बोलताना म्हणाले की, ‘जेव्हा 24 वर्षांनंतर आमचं लग्न मोडलं, तो काळ खूप त्रासदायक होता. त्यावेळी मी जवळपास 55 वर्षांचा होतो. सगळं काही उद्ध्वस्त झाल्यासारखं वाटलं. एखाद्या गोष्टीत आपण स्वतःला इतकं गुंतवलं आणि त्याचं असं फळ मिळालं, हे खूप त्रासदायक असतं.’
‘माझं नातं एका अत्यंत वैयक्तिक कारणामुळे संपलं. त्याबद्दल बोलून कोणालाही काही मिळणार नाही. असं व्हावं असं कुणालाही वाटलं नव्हतं, पण ते घडलं.’ असं आशिष यांनी शेवटी म्हटलं.
आशिष पुढे म्हणाले की, ‘मी एक प्रेरक वक्ता आणि अभिनेता आहे. पण लोक माझ्याबद्दल काय बोलले आणि मी त्याचा सामना कसा केला हे मला माहीत आहे. जेव्हा लोक मतप्रदर्शन करतात, तेव्हा त्यांना परिस्थिती समजलेली नसते. तरीही, ते आत्मविश्वासानं बोलतात. आणि जेव्हा असं काही घडतं, तेव्हा फक्त एक व्यक्ती नाही, तर सगळेच बोलतात. लोक मला म्हणायचे, ‘आता लग्न करण्याची काय गरज आहे? तू लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये का राहत नाहीस?’ काही लोक म्हणाले की, माझं करिअर संपलं आहे आणि मी शांत बसून माझ्या मुलाला मोठं होताना पाहावं. हे सगळं बोलणं थांबवा असं मला लोकांना सांगावं लागलं.’