तुम्ही इथे येऊन नाटक करा..; आस्ताद काळेनं प्रयोग थांबवून प्रेक्षकाला सुनावलं, नेमकं काय घडलं?

अभिनेता आस्ताद काळेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तो नाटक मध्येच थांबवून स्टेजवरून एका प्रेक्षकाला फटकारताना दिसतोय. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

तुम्ही इथे येऊन नाटक करा..; आस्ताद काळेनं प्रयोग थांबवून प्रेक्षकाला सुनावलं, नेमकं काय घडलं?
Astad Kale
Image Credit source: Instagram
| Updated on: Mar 18, 2026 | 9:14 AM

रंगभूमीवर नाटक सादर करणाऱ्या कलाकाराची मेहनत किती असते, हे रसिक प्रेक्षकांना माहितच आहे. नाटकात व्यत्यय येऊ नये किंवा नाट्यगृहातील शांतता भंग होऊ नये आणि नाटकाचा पुरेपूर आनंद रसिकांना घेता यावा यासाठी नाट्यगृहात मोबाइल सायलेंटवर ठेवण्याबाबत, फोनवर न बोलण्याबाबत विनंती केली जाते. मध्यंतरीच्या काळात या घटना वाढत असताना नाटक सुरू होण्यापूर्वी कलाकारांकडून प्रेक्षकांसमोर येऊन याबद्दल खास विनंती केली जायची. नाटक पाहताना फोन सायलेंट ठेवा, फोनवर मोठमोठ्याने बोलू नका किंवा अगदीच इमर्जन्सी असेल तर बाहेर जाऊन फोनवर बोला, लहान मूल रडत असेल तर त्यांना घेऊन बाहेर जा.. अशा सूचना नाटक सुरू होण्यापूर्वी दिल्या जातात. तरीही या नियमांचा भंग अनेकदा होताना दिसून येतं. नुकत्याच एका नाटकाच्या प्रयोगादरम्यान अशाच एका घटनेवरून अभिनेता आस्ताद काळे प्रचंड चिडला होता.

आस्ताद सध्या रंगभूमीवर ‘सविता दामोदर परांजपे’ या नाटकाचे प्रयोग करतोय. सांस्कृतिक कलादर्पण व्यावसायिक नाट्य महोत्सवात हे नाटक सादर करण्यात आलं होतं. प्रयोग सुरू असतानाच रसिक प्रेक्षकांमधील एक व्यक्ती फोनवर बोलू लागली. यामुळे साहजिकच मंचावरील कलाकारांचं लक्ष विचलित झालं. अखेर नाटक सादर करणारा आस्ताद काळे मध्येच थांबला आणि स्टेजवरूनच फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीला सुनावलं. “आम्ही तुमच्या जागी फोनवर बोलतो, तुम्ही इथे येऊन नाटक सादर करा”, असं तो थेट त्या व्यक्तीला बोलतो. यावेळी आस्ताद काळेचा संताप स्पष्ट दिसून येतो. काही सेकंद थांबून तो नंतर प्रेक्षकांची माफी मागतो आणि नाटक पुन्हा सुरू करतो. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

‘जेव्हा नाटक बघायला जाता तेव्हा प्रेक्षकांनी भान ठेवायला पाहिजे की आपण नाटक बघायला आलो आहोत, चित्रपट नाही. शेवटी त्या कलाकाराला किती मेहनत घ्यावी लागते, हे जे वाईट कमेंट करत आहेत त्यांनी एकदा नाटकाची तालीम करून दाखवावी. बोलणं खूप सोपं असतं, विचार करा ते स्टेजवर उभे आहेत आणि खाली तुम्ही मोबाईलवर बोलताय,’ असं एकाने लिहिलं. तर ‘नाट्यगृहात पाठांतर लक्षात ठेऊन अभिनय खूप कठीण असतं. त्यात कॉल येणं, लहान मूल रडणं, एकाग्रता भंग करत स्टेजवरील अभिनेते आणि नाटक बघायला आलेले प्रेक्षक दोघांनाही याचा त्रास होतो. ज्यांना हे समजत नाही त्यांनी नाटकाला जाऊ नये,’ असं दुसऱ्याने म्हटलंय.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us