Bigg Boss 16: बिग बॉसच्या घरात मुलीचं अफेअर पाहून वडिलांची थेट प्रतिक्रिया

सुंबुल-शालीनमध्ये 20 वर्षांचं अंतर; वाढती जवळीक पाहून वडील म्हणाले..

Bigg Boss 16: बिग बॉसच्या घरात मुलीचं अफेअर पाहून वडिलांची थेट प्रतिक्रिया
सुम्बुल, शालीन
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 10, 2022 | 3:47 PM

मुंबई- टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त शो ‘बिग बॉस 16’ (Bigg Boss 16) सध्या चांगलाच चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरात लव्ह-स्टोरीज बनणं, अफेअर होणं हे काही नवीन नाही. सध्या बिग बॉसच्या घरातील अशीच एक जोडी सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. काही जण या दोघांच्या प्रेमकहाणीची तुलना सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज गिल यांच्याशी करत आहेत. तर काही जण दोघांमधील वयाचं अंतर पाहून नापसंती दर्शवत आहेत. ही जोडी आहे ‘इमली’ फेम टीव्ही अभिनेत्री सुंबुल तौकीर (Sumbul Touqeer) आणि शालीन भनोत (Shalin Bhanot) यांची.

या दोघांमधील वाढती जवळीत बिग बॉसच्या घरात स्पष्ट पहायला मिळतेय. यावर सर्वांत आधी टीना दत्ताने कमेंट केली होती. मात्र शालीनने नकार देत सुंबुलला ‘बच्ची’ म्हटलं. सुंबुल आणि शालीन यांच्या वयात जवळपास 20 वर्षांचं अंतर आहे. तरीसुद्धा या दोघांमधील खास मैत्री सर्वांचं लक्ष वेधून घेतेय.

सुंबुल आणि शालीनच्या अफेअरच्या चर्चांवर आता सुंबुलचे वडील तौकिर खान यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ‘टाइम्स नाऊ’ला दिलेल्या मुलाखतीत तौकिर यांनी तिला सर्वांत आधी खेळावर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला दिला. मात्र नंतर त्यांनी आपल्या मुलीची बाजू घेतली.

तौकिर खान म्हणाले, “मी आधी शालीनला ओळखत नव्हतो, मात्र आता ओळखू लागलो आहे. सुंबुल जेव्हा बिग बॉसच्या घरात जात होती, तेव्हा मी तिला म्हटलं होतं की ते घर म्हणजे शादी डॉटकॉम किंवा परफेक्ट मॅच शोधणारी जागा नाही.”

सुंबुलची बाजू घेत ते पुढे म्हणाले, “ती जे काही करतेय, तिची जी काही प्लॅनिंग आहे, ते सर्व करण्याचं स्वातंत्र्य तिला आहे. तिथे तिची मदत करण्यासाठी कोणी नाही. जर खेळ खेळत असेल तर चुका करून त्यातून ती स्वत: शिकेल. एवढ्या छोट्याशा गोष्टीसाठी जर तिला घराबाहेर बोलवावं लागलं तर मी आजपर्यंत तिच्यासाठी जे काही म्हटलं, ज्या कविता लिहिल्या, त्या सर्व व्यर्थ आहेत.”

सुंबुलने ‘इमली’ या मालिकेतून प्रचंड लोकप्रियता मिळवली. या मालिकेतील मुख्य अभिनेता फहमान खान याच्याशीही तिचं नाव जोडलं गेलं होतं. मात्र बिग बॉसच्या घरात गेल्यापासून सुंबुल आणि शालीनमध्ये जवळीक वाढताना दिसून येतेय.