‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीच्या घरात चोरी; इतके लाख रुपये घेऊन नोकर फरार

'बिग बॉस' या शोमधून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री कशिश कपूरच्या घरात चोरी झाली. घरात काम करणाऱ्या नोकरानेच कपाटातून पैशांची चोरी केली. याप्रकरणी तिने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. चोरीच्या या घटनेवर कशिशने प्रतिक्रिया दिली आहे.

बिग बॉस फेम अभिनेत्रीच्या घरात चोरी; इतके लाख रुपये घेऊन नोकर फरार
कशिश कपूर
Image Credit source: Instagram
| Updated on: Jul 13, 2025 | 10:28 AM

‘बिग बॉस 18’मध्ये झळकलेली अभिनेत्री कशिश कपूरच्या घरात चोरी झाली. याप्रकरणी तिने घरकाम करणाऱ्या सचिन कुमार चौधरीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. सचिनने घरातील कपाटातून चार लाख रुपये चोरल्याचा आरोप तिने केला आहे. मुंबईतल्या अंबोली पोलिसांनी त्याच्याविरोधात आयपीसीच्या कलम 306 अंतर्गत एफआयआर दाखल केली आहे. कशिश ही मूळची बिहारमधल्या पूर्णिया इथली असून ती कामानिमित्त मुंबईत राहते. मुंबईतल्या अंधेरी पश्चिममध्ये तिचं घर आहे. तिने अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. कशिशला ‘बिग बॉस’ या शोमधून बरीच प्रसिद्धी मिळाली.

सचिन कुमार चौधरी हा गेल्या पाच महिन्यांपासून कशिशच्या घरात काम करत होता. तो दररोज सकाळी 11.30 वाजता घरी यायचा आणि सर्व कामं आटपून दुपारी 1 वाजता निघून जायचा. कशिश कपूरच्या तक्रारीनुसार, तिने तिच्या कपाटात काही रोख रक्कम ठेवली होती. 6 जुलै रोजी जेव्हा तिने कपाटातील पैसे तपासले, तेव्हा त्यात 7 लाख रुपये होते. त्यानंतर 9 जुलै रोजी तिने तिच्या आईला काही पैसे पाठवण्यासाठी कपाट उघडलं, तेव्हा त्यात फक्त 2.5 लाख रुपये बाकी होते. कपाटातून साडेचार लाख रुपये गायब होते. कशिशने कपाटात आणि संपूर्ण घरात शोधाशोध केली, परंतु तिला कुठेच पैसे सापडले नाहीत.

पैसे गायब झाल्यानंतर कशिशने त्यावेळी कामावर असलेल्या सचिनची चौकशी केली. तेव्हा तो खूपच घाबरलेल्या अवस्थेत दिसला. कशिशने त्याचे खिसे तपासण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याने स्पष्ट नकार दिला. त्यानंतर त्याने 50 हजार रुपये काढून दिले आणि तिथून पळून गेला. उर्वरित चार लाख रुपयेसुद्धा त्याच्याकडेच असल्याचं समजल्यानंतर कशिशने अंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी एफआयआर दाखल केली. प्राथमिक तपासानुसार, आरोपीने त्याच्यासोबत रोख रक्कम घेऊन लगेच घरातून पळण्याचा प्लॅन बनवला होता.

याप्रकरणी प्रतिक्रिया देताना कशिश म्हणाली, “मला या घटनेमुळे खूप मोठा धक्का बसला आहे. मी त्याच्यावर खूप विश्वास केला होता. परंतु त्याने माझा विश्वासघात केला. मला आशा आहे की पोलीस त्याला लवकरात लवकर पकडतील आणि मला न्याय मिळेल.”