अरमान-कृतिकाचा इंटिमेट व्हिडीओ पाहून भडकली पायल मलिक; “इतकं घाणेरडं..”

युट्यूबर अरमान मलिक आणि त्याची पत्नी कृतिका मलिक यांचा बिग बॉसच्या घरातील एक इंटिमेट व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर अरमानची पहिली पत्नी पायल मलिकने प्रतिक्रिया दिली आहे.

अरमान-कृतिकाचा इंटिमेट व्हिडीओ पाहून भडकली पायल मलिक; इतकं घाणेरडं..
पायल मलिक, अरमान आणि कृतिका मलिक
Image Credit source: Twitter
| Updated on: Jul 21, 2024 | 1:52 PM

‘बिग बॉस ओटीटी’चा तिसरा सिझन सध्या चांगलाच चर्चेत आहे. या शोमध्ये युट्यूबर अरमान मलिक त्याच्या दोन पत्नींसोबत पोहोचला होता. सुरुवातीला त्याच्या दोन लग्नांवरून अनेकांनी सवाल उपस्थित केला होता. त्यानंतर काही दिवसांतच पहिला पत्नी पायल मलिक बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली. आता अरमान आणि त्याची पत्नी कृतिका मलिक स्पर्धक म्हणून बिग बॉसच्या घरात एकत्र राहत आहेत. अशातच या दोघांचा एक इंटिमेट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. ज्यावरून नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी अरमानला शोमधून काढून टाकण्याची मागणी केली आहे. आता त्यावर पायलची प्रतिक्रिया समोर आली आहे.

पती अरमान आणि सवत कृतिका यांचा इंटिमेट व्हिडीओ पाहिल्यानंतर पायलने एक व्लॉग शेअर केला आहे. यामध्ये पायलने असा दावा केला आहे की अरमान आणि कृतिकाचा हा व्हिडीओ एडिट करून सोशल मीडियावर व्हायरल केला जात आहे. पायल बिग बॉसच्या घरात गेली होती, त्यामुळे कोणती वस्तू कुठे आहे हे तिला नीट माहित आहे. व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या वस्तूंवरून तिने म्हटलंय की अरमान-कृतिकाचा व्हिडीओ मॉर्फ केलेला आहे. पायल याविषयी म्हणते, “बिग बॉसच्या घरात काय कुठे आहे, हे मला माहित आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये जिथे बेड दिसतंय आणि त्यावर एक दिवा दिसतोय, ते तिथे नाहीच आहेत. बिग बॉसच्या घरात बेडच्या इथे एक कॅमेरा आणि लाइट आहे. तिथे कोणताच दिवा नाही. व्हिडीओमध्ये दिसणारं ब्लँकेटसुद्धा वेगळं आहे. बिग बॉसच्या घरात राहिलेली व्यक्ती हे सहज ओळखू शकते.”

“मी या व्हिडीओबद्दल बोलतेय, कारण आता मुलगा चिकू खूप लहान आहे. त्याने जर हा व्हिडीओ पाहिला तर त्याच्या मनावर काय परिणाम होईल? त्यामुळे मी हात जोडून विनंती करते की माझ्या कुटुंबीयांना इतक्या घाणेरड्या प्रकारे दाखवू नका. ज्या गोष्टी घडल्याच नाहीत त्या अशा पद्धतीने एडिट करून दाखवू नका”, अशी विनंती तिने नेटकऱ्यांना केली.

अरमानने पायलचीच खास मैत्रीण कृतिकाशी दुसरं लग्न केलं. या लग्नाबद्दल कळताच पायल तिच्या मुलाला घेऊन घर सोडून गेली होती. जवळपास वर्षभर ती अरमानपासून दूर राहिली होती. दुसऱ्या लग्नानंतर अरमान आणि पायलच्या आयुष्यात बरेच चढउतार आले होते. एक वेळ अशी आली होती, जेव्हा अरमानने त्याचा जीव देण्याचा प्रयत्न केला होता.