
मुंबई: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री वैशाली ठक्कर (vaishali takkar) हिच्या आत्महत्येमुळे संपूर्ण बॉलिवूड (bollywood) हादरून गेलं आहे. मात्र, वैशालीचा मृत्यू होऊन आज चार दिवस झाले तरी बॉलिवूडमधून काहीच प्रतिक्रिया आली नव्हती. या प्रकरणावर अभिनेता मुकेश खन्ना (mukesh khanna) यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. वैशालीच्या आत्महत्येनंतर मुकेश खन्ना हे फिल्म इंडस्ट्रीवर भडकले आहेत. बॉलिवूडमधील आत्महत्या रोखण्यासाठी तुम्ही काय केलं? असा सवाल मुकेश खन्ना यांनी केला आहे.
मुकेश खन्ना यांनी त्यांच्या युट्यूब चॅनलवर एक व्हिडीओ शेअर करून वैशाली ठक्करच्या आत्महत्येला वाचा फोडली आहे. इंडस्ट्रीत किती वर्षापासून आत्महत्येचे प्रकार सुरू आहेत. हे सुद्धा त्यांनी सांगितलं. ग्लॅमर वर्ल्डच्या जीवनाच्या मागचं वास्तव काही वेगळच आहे. काही लोक काम मिळत नसल्याने त्रस्त आहेत. तर काही लोक आपल्या पर्सनल लाइफमुळे डिप्रेशनमध्ये आहेत, असं सांगतानाच एका हसत्या खेळत्या चेहऱ्याने कसं आपलं जीवन संपवलं हे सुद्धा त्यांनी सांगितलं.
इंडस्ट्रीत काही लोक खूप सेन्सेटिव्ह असतात. 29 हे वय असतं तरी काय? वैशालीने अजून आयुष्याला सुरुवातही केली नव्हती. देवाने तिला चांगलं आयुष्य दिलं होतं. भावनिक होऊन तिने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. वैशाली सेटवर सर्वांना हसवायची. ती कशी आत्महत्या करू शकते?, असा सवाल त्यांनी केला.
प्रत्येक व्यक्ती विचार करत असेल की ती किती हसतमुख आहे. इंडस्ट्रीत गेल्या तीन वर्षात अनेकांनी आत्महत्या केली. लोकांना काही दिवस त्याचं आश्चर्य वाटतं. शोक व्यक्त करतात. पुन्हा काय करतात? आत्महत्येचं हे लोण कधी थांबणार आहे? कुणीच हे थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. एखाद्याने आत्महत्या केल्याचं कळल्यानंतर तुम्ही काय करता याचच मला आश्चर्य वाटतं, असंही ते म्हणाले.
तुम्हाला पुढे येऊन एक फार मोठी संस्था तयार करायला हवी. त्यात मनोरुग्ण तज्ज्ञांना नियुक्त करा. एखादा कलाकार डिप्रेशनमध्ये गेल्यानंतर त्याने तिथे जाऊन मोफत उपचार घेतला पाहिजे. त्याच्या मनातील गोष्ट डॉक्टरांना सांगावी. तुम्ही डॉक्टरांना भेटा. एक दोन तास मन व्यक्त केल्यास आत्महत्येच्या टोकाला पोहोचलेला व्यक्ती आत्महत्येपासून परावृत्त होऊ शकतो. इंडस्ट्रीने त्याबाबत विचार केला पाहिजे, असं आवाहन त्यांनी केलं.