‘अबकी बार मोदी सरकार’चा नारा देणारे पियुष पांडे काळाच्या पडद्याआड; जाहिरात क्षेत्रातील अ‍ॅडमॅन हरपला

जाहिरात क्षेत्रातील अ‍ॅडमॅन हरपला... ‘अबकी बार मोदी सरकार’चा नारा देणारे पियुष पांडे यांचं निधन झालं आहे. त्यांच्या निधनामुळे जाहिरात क्षेत्राचं मोठं नुकसान झालं आहे. वयाच्या 70 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.

‘अबकी बार मोदी सरकार’चा नारा देणारे पियुष पांडे काळाच्या पडद्याआड; जाहिरात क्षेत्रातील अ‍ॅडमॅन हरपला
फाईल फोटो
| Updated on: Oct 24, 2025 | 2:21 PM

‘अबकी बार मोदी सरकार’ हा प्रसिद्ध नारा देणारे पियुष देणारे पियुष पांडे यांचं निधन झालं आहे. वयाच्या 70 व्या वर्षी पियुष पांडे यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर जाहिरात क्षेत्रातील अ‍ॅडमॅन हरपला असं म्हणायला हरकत नाही. गेल्या महिन्यापासून पियुष पांडे यांच्या प्रकृती खालावली होती. त्यांच्यावर उपचार देखील सुरु होते. पण पियुष पांडे यांनी अखेरचा श्वास घेतला. पांडे यांनी त्यांच्या सर्जनशीलता आणि साधेपणाने भारतीय जाहिरातींची व्याख्या बदलली. त्यांनी हे सिद्ध केलं की, जाहिरात ही केवळ प्रॉडक्ट विकण्याचे साधन नाही तर लोकांशी जोडण्याचा देखील एक उत्तम मार्ग आहे.

जयपूर येथून सुरु झाला प्रवास…

राजस्थानमधील जयपूर येथे जन्मलेले पीयूष पांडे बालपणापासूनच त्यांच्या रचनात्मक विचारांसाठी ओळखले जात होते. त्यांच्या घरात कलात्मक वातावरण होतं. त्यांचा भाऊ प्रसून पांडे चित्रपट दिग्दर्शक झाला आणि त्यांनी एकत्रितपणे रेडिओ जिंगल्सना आपला आवाज दिला. 1982 मध्ये ओगिल्वी इंडियामध्ये येण्यापूर्वी, पियुष क्रिकेट खेळायचे. परंतु जाहिरातींच्या जगात त्यांनी खरी ओळख मिळाली, जिथे त्यांनी प्रत्येक जाहिरातीत भारतीयत्व आणि भावनांचा समावेश केला.

पियुष पांडे यांनी जेव्हा करीयर सुरु केलं, तेव्हा जाहिरात विश्वात इंग्रजी आणि पाश्चात्य शैलीचा बोलबाला होतो. जो पांडे यांनी मोडून काढला… त्यांनी सामान्य भारतीयांना भावणाऱ्या जाहिराती तयार केल्या. त्यांच्या संस्मरणीय प्रोजेक्टमध्ये एशियन पेंट्सचे ‘हर खुशी में रंग लाये’ यांचा समावेश आहे. कॅडबरीसाठी ‘कुछ खास है’, ठंडा मतलब कोका-कोला, फेविकॉल अशा कितीतरी उत्पादनांना कायम लक्षात राहतील, अशा जाहिराती पांडे यांनी दिल्या.

‘अबकी बार मोदी सरकार’चा प्रसिद्ध नारा…

जाहिरातीच्या विश्वातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी भारतीय राजकारणात देखील स्वतःची छाप सोडली… 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजप पक्षाला सर्वात चर्चीत नारा दिला आणि तो म्हणजे ‘अबकी बार मोदी सरकार’… हा नारा आजही प्रसिद्धा आहे.

2018 मध्ये, पियुष पांडे आणि त्यांचा भाऊ प्रसून पांडे यांना कान्स लायन्सचा सेंट मार्क्स पुरस्कार मिळाला, जो त्यांच्या आजीवन रचनात्मक कामगिरीसाठी आंतरराष्ट्रीय सन्मान आहे. 2023 मध्ये त्यांनी ओगिल्वी इंडियाच्या कार्यकारी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि सल्लागाराची भूमिका स्वीकारली.