Brahmastra: सोना मोहपात्राकडून रणबीर-आलियाचं समर्थन; ट्रोलर्सना सुनावलं

बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून मंदिराबाहेर जोरदार निदर्शनं केली गेली. त्यामुळे रणबीर-आलियाला दर्शन न घेताच परतावं लागलं. अशात आता गायिका सोना मोहपात्राने (Sona Mohapatra) या दोघांना पाठिंबा दिला आहे.

Brahmastra: सोना मोहपात्राकडून रणबीर-आलियाचं समर्थन; ट्रोलर्सना सुनावलं
सोना मोहपात्रा धावली रणबीर-आलियाच्या मदतीला
Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Sep 09, 2022 | 1:00 PM

जवळपास पाच वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अखेर अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ब्रह्मास्त्र’ (Brahmastra) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर या चित्रपटाची तुफान चर्चा होती. एकीकडे गोमांसबद्दल रणबीर कपूरच्या जुन्या वक्तव्यावरून चित्रपटावर बहिष्काराची मागणी झाली. तर दुसरीकडे उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात (Mahakaleshwar Temple) रणबीर-आलियाला देवाचं दर्शन घेता आलं नाही. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून मंदिराबाहेर जोरदार निदर्शनं केली गेली. त्यामुळे रणबीर-आलियाला दर्शन न घेताच परतावं लागलं. अशात आता गायिका सोना मोहपात्राने (Sona Mohapatra) या दोघांना पाठिंबा दिला आहे.

सोनाने ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर करत लिहिलं, ‘आपल्याला गर्दीच्या शासनाचा भाग बनायचं नाहीये. अशाने कोणत्याच प्रकारची हिरोगिरी सिद्ध होत नाही. हा फक्त मूर्खपणा आहे.’ रणबीर-आलिया मंदिराबाहेर झालेल्या विरोधावरून सोनाने हे वक्तव्य केलंय. भारतात हे जे घडतंय, ते अत्यंत चुकीचं आहे, असंही तिने म्हटलंय.

रणबीरच्या एका जुन्या मुलाखतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल होतोय. या मुलाखतीत रणबीर गोमांसविषयी बोलताना दिसत आहे. 11 वर्षांपूर्वीच्या त्याच्या या वक्तव्यावरून सध्या त्याच्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाला आणि त्याला विरोध केला जातोय.

रणबीर-आलियाला विरोध करण्यासाठी बजरंग दलाने महाकालेश्वर मंदिराबाहेर काळे झेंडे फडकावत निदर्शनं केली होती. त्यानंतर स्थानिक पोलिसांनी तिथली परिस्थिती नियंत्रणात आणली. काही कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्जही केला.

रणबीर-आलियाला मंदिरात जाऊन दर्शन घेता आलं नाही. दिग्दर्शक अयान मुखर्जीने दर्शन घेतलं. “रणबीर-आलिया माझ्यासोबत आत येऊ शकले नाहीत, याचं मला वाईट वाटलं”, अशी प्रतिक्रिया नंतर अयानने दिली.