
दक्षिण कोरियातील जगप्रसिद्ध के-पॉप बँडचा सदस्य आणि प्रसिद्ध पॉप स्टार जे - होप हा देशसेवेसाठी सैन्यात रुजू झाला आहे. मंगळवारी (18 एप्रिल) जे - होप अधिकृतरित्या दक्षिण कोरियाच्या सैन्यात दाखल झाला.

दक्षिण कोरियाच्या नियमांनुसार, शारीरिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या 18 ते 28 वर्षीय पुरुषांना सैन्यात दाखल होऊन 18 ते 21 महिने देशाची सेवा करावीच लागते. बीटीएस या बँडच्या सात सदस्यांसाठी ही वयोमर्यादा 30 वर्षांची करण्यात आली होती.

दक्षिण कोरियाच्या सैन्यात रुजू होणारा जे-होप हा बीटीएस बँडमधील दुसरा सदस्य ठरला आहे. याआधी डिसेंबर महिन्यात जिन हा सदस्य सैन्यात दाखल झाला होता.

दक्षिण कोरियाची राजधानी असलेल्या सेऊल (Seoul) पासून 87 किलोमीटरवर दूर असलेल्या वोंजू या ठिकाणी जे-होप मंगळवारी दाखल झाला. यावेळी त्याला निरोप देण्यासाठी बीटीएस बँडमधील इतर सहा सदस्य तिथे उपस्थित होते.

जे-होपचं खरं नाव जंग होसोक असं आहे. सुरुवातीला त्याला पाच आठवड्यांचं प्रशिक्षण दिलं जाईल. त्यानंतर विविध ठिकाणी त्याला सैन्यदलातील जबाबदाऱ्या पूर्ण कराव्या लागतील.

बीटीएस बँडचे सातही सदस्य एकानंतर एक सैन्यात रुजू होणार आहेत. 2025 पर्यंत या सातही जणांची सैन्यातील सेवा पूर्ण होणार आहे. गेल्या काही वर्षांत के-पॉप जगभरात लोकप्रिय होऊ लागलं. याचं सर्वांत मोठं श्रेय बीटीएस या बँडला जातं.

तुम्ही जगप्रसिद्ध सेलिब्रिटी असलात तरी देशसेवेला प्राधान्य देणं महत्त्वाचं असतं, हीच शिकवण या बँडने दिल्याचं चाहते म्हणाले. बीटीएस बँडच्या सर्व सदस्यांनी सैन्यातील जबाबदारी पार पडल्यानंतर 2025 मध्ये पुन्हा एकत्र येतील.