Chhavi Mittal: छवी मित्तलला रेडिओथेरेपीच्या साइड इफेक्ट्सची सतावतेय भिती; ब्रेस्ट कॅन्सरशी देतेय झुंज

पुढील चार आठवड्यांसाठी छवीला (Chhavi Mittal) रेडिओथेरेपीचा सामना करावा लागणार आहे. चार आठवडे आणि आठवड्यातून पाच दिवस असं २० वेळा तिच्या रेडिओथेरेपी करण्यात येईल.

Chhavi Mittal: छवी मित्तलला रेडिओथेरेपीच्या साइड इफेक्ट्सची सतावतेय भिती; ब्रेस्ट कॅन्सरशी देतेय झुंज
छवी मित्तल
Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: May 23, 2022 | 2:27 PM

टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री छवी मित्तलवर (Chhavi Mittal) गेल्या महिन्यात स्तनाच्या कर्करोगाची (Breast Cancer) शस्त्रक्रिया करण्यात आली. सोशल मीडियावर पोस्ट लिहित ती सातत्याने चाहत्यांमध्ये कर्करोगाविषयी जागरुकता निर्माण करण्याचा, सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न करतेय. सर्जरीनंतर आता छवीवर रेडिओथेरेपी (radiotherapy) करण्यात येणार आहे. मात्र रेडिओथेरेपीच्या साइड इफेक्ट्समुळे तिच्या मनात भिती निर्माण झाली आहे. असं असलं तरी कर्करोगाविरोधातील ही लढाई आपण जिंकणारच, असा विश्वासही तिने व्यक्त केला आहे. छवीने सोमवारी इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तिने तिच्या नव्या प्रवासाबद्दल सांगितलं आहे.

‘आजपासून माझ्यावर रेडिओथेरेपी करण्यात येणार आहे. त्याचे काही साइड इफेक्ट्स जाणवतील असं डॉक्टरांनी मला सांगितलंय. मला याआधीही अनेकांनी विचारलंय की किमो किंवा रेडिओथेरेपी करणं हे रुग्णाच्या निर्णयावर अवलंबून असतं का? तांत्रिकदृश्या सांगायचं झाल्यास, तुम्हाला परवानगी पत्रावर स्वाक्षरी करावी लागते, पण तुमचे डॉक्टर तुमच्यावरील उपचाराविषयी ठरवतात, कारण ते त्यात तज्ज्ञ असतात. तुमचा जीव कसा वाचवता येईल, यावर त्यांचं लक्ष केंद्रीत असतं, साइड इफेक्ट्स टाळण्यावर नाही’, असं तिने लिहिलं.

छवी मित्तलची पोस्ट-

पुढील चार आठवड्यांसाठी छवीला रेडिओथेरेपीचा सामना करावा लागणार आहे. चार आठवडे आणि आठवड्यातून पाच दिवस असं २० वेळा तिच्या रेडिओथेरेपी करण्यात येईल. ‘मला रेडिओथेरेपीची भीती नाही, पण त्याच्या साइड इफेक्ट्सची आहे. कारण मी फक्त श्वास घेण्यासाठी जगत नाहीये, तर आनंदासाठी जगतेय. मला आयुष्यातील सर्व गोष्टींचा अनुभव घ्यायचा आहे. सुदैवाने माझे डॉक्टर यात माझी खूप मदत करतायत. ही लढाई मला जिंकायचीच आहे’, असं तिने पुढे लिहिलंय.

छवीच्या या पोस्टवर इंडस्ट्रीतील तिच्या मित्रमैत्रिणींनी आणि नेटकऱ्यांनी कमेंट्स करत तिला धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. एप्रिल महिन्यात छवीवर शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर बरी झाल्यानंतर छवीने कामालाही सुरुवात केली होती. जिममध्ये व्यायाम करतानाचेही फोटो तिने पोस्ट केले होते.