Kareena Kapoor : 200 वर्षांपूर्वीचं पाचूचं पेंडंट परिधान करणं करीनाच्या अंगलट, काँग्रेस नेत्यानं पाठवली नोटीस, काय घडलं?
Kareena Kapoor Controversy : करीना कपूरनं दिवाळी लूकमध्ये घातलेल्या ३०-कॅरेटच्या पाचूच्या पेंडंटवरून वाद निर्माण झाला आहे. कुराणातील एक आयत लिहिलेल्या या शाही नेकलेसवरून काँग्रेस नेते अब्बास हाफीज यांनी करीना आणि रिया कपूर यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

बॉलिवूडची बेबो, करीना कपूर खान, पुन्हा एकदा चर्चेत आहे. यावेळी तिच्या चित्रपटांमुळे किंवा फॅशनमुळे नाही, तर तिनं दिवाळीत घातलेल्या एका खास शाही नेकलेसमुळे. करीनानं दिवाळीसाठी कुराणमधील पवित्र आयत-अल-कुर्सी कोरलेलं 30-कॅरेटचं पाचूचं पेंडंट घातलं होतं. या दागिन्यामुळे आता वादाला तोंड फुटलं आहे. काँग्रेस नेते आणि पक्षाचे राष्ट्रीय माध्यम समन्वयक, अब्बास हाफीज यांनी करीना आणि तिची स्टायलिस्ट, रिया कपूर यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.
करीनानं तिच्या दिवाळी लूकचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. या फोटोंमध्ये ती डिझायनर पुनीत बलनानं डिझाइन केलेला बेज रंगाचा कफ्तान आणि पगडी घातलेली दिसली. तिच्या शाही लूकचं मुख्य आकर्षण म्हणजे कुराणमधील आयत कोरलेलं खास 30-कॅरेटचं पाचूचं पेंडंट होतं. हे फोटो समोर आल्यानंतर तिच्या लूकची मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली होती, पण आता हेच पेंडंट वादाचं कारण बनलं आहे.
करीनाचा संपूर्ण लूक तिची जवळची मैत्रीण आणि सेलिब्रिटी स्टायलिस्ट, रिया कपूरनं तयार केला होता. इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करताना रियानं खुलासा केला की, करीनानं सुमारे 200 वर्षे जुने शाही दागिने घातले होते. यामध्ये भोपाळच्या नवाबाचा तुरा आणि भोपाळच्या बेगमचा 30-कॅरेटचा पाचू, ज्यावर आयत-अल-कुर्सी कोरलेली आहे, यांचा समावेश आहे. रियानं हेही सांगितलं की, हे दागिने भोपाळच्या राजघराण्याचे वारसा हक्काचे आहेत आणि सैफ अली खानच्या कुटुंबाकडून करीनाला मिळाले आहेत. याचा अर्थ हे विशेष लॉकेट थेट पतौडी आणि भोपाळच्या राजघराण्यांशी जोडलेलं आहे.
काँग्रेस नेत्याकडून करीना आणि रिया कपूर यांना नोटीस
अब्बास हफीज यांनी 11 नोव्हेंबर रोजी करीना कपूर आणि रिया कपूर यांना कायदेशीर नोटीस पाठवली. त्यामध्ये, त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेला फोटो, व्हिडिओ आणि पोस्टवर आक्षेप घेतला आहे, ज्यामध्ये करीना हे पेंडंट घातलेली दिसत आहे.
या नोटीसमध्ये मागणी करण्यात आली आहे की, दोन्ही बाजूंनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून संबंधित फोटो आणि व्हिडिओ हटवावेत. तसेच, त्यांनी सार्वजनिकरित्या माफी मागावी आणि भविष्यात पवित्र कुराणातील आयत असलेले दागिने अशा प्रकारे प्रदर्शित करणार नाहीत, ज्यामुळे त्याच्या धार्मिक प्रतिष्ठेला धक्का लागेल, असं आश्वासन द्यावं. अब्बास हफीज यांनी त्यांच्या नोटीसमध्ये स्पष्ट केलं आहे की, करीनाचे कपडे, तिची वैयक्तिक निवड किंवा दागिने घालण्याच्या तिच्या स्वातंत्र्यावर त्यांचा कोणताही आक्षेप नाही. त्यांचा आक्षेप विशेषतः फोटोंमध्ये पवित्र कुराणातील आयत असलेलं पेंडंट ज्या पद्धतीने प्रदर्शित केलं गेलं आहे, त्यावर आहे. नोटीसनुसार, आयत-अल-कुर्सीसारख्या पवित्र आयतीचा धार्मिक सन्मान आणि आदर, ती परिधान करताना किंवा सार्वजनिकरित्या प्रदर्शित करताना जपला पाहिजे.
करीनाच्या लॉकेटचा इतिहासही खूप रंजक आहे. खरं तर, भोपाळचे शेवटचे शासक नवाब हमीदुल्ला खान यांची मुलगी साजिदा सुलतान ही सैफ अली खानची आजी होती. साजिदा सुलतान यांचा विवाह इफ्तिखार अली खान पठाउदी यांच्याशी झाला होता. त्यांचा मुलगा मन्सूर अली खान पतौडी सैफ अली खानचे वडील होते. या राजघराण्याच्या वारसा हक्कानं हे दागिने सैफ अली खान आणि नंतर करीना कपूर यांच्यापर्यंत पोहोचले. रिया कपूरनंही तिच्या पोस्टमध्ये या कौटुंबिक इतिहासाचा उल्लेख केला आहे.
मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप
अब्बास हफीज यांनी त्यांच्या नोटीसमध्ये दावा केला आहे की, ज्या प्रकारे हे पेंडंट सोशल मीडियावर प्रदर्शित केलं गेलं, त्यामुळे मुस्लिम समाजातील काही सदस्यांच्या आणि भोपाळच्या पूर्वीच्या राजघराण्याशी संबंधित कुटुंबांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. मात्र, अब्बास यांनी स्पष्ट केलं आहे की, त्यांनी ही नोटीस वैयक्तिक पाठवली आहे, काँग्रेस पक्षाच्या वतीनं नाही. सध्या, या संपूर्ण प्रकरणावर करीना कपूर आणि रिया कपूर यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.