इमरान हाश्मीच्या ‘गनमास्टर G9’ चा ट्रेलर रिलीज, सीन पाहूनच चाहते म्हणाले ब्लॉकबस्टर..
इमरान हाश्मीचा 'गनमास्टर G9'मध्ये अॅक्शनचा धुमाकूळ. धमाकेदार ट्रेलर रिलीज, जेनेलियासोबत रोमान्सचीही झलक. ट्रेलरने वाढवली चाहत्यांची उत्सुकता.

बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मी पुन्हा एकदा दमदार अॅक्शन अवतारात प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याच्या आगामी ‘गनमास्टर G9’ या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर नुकताच रिलीज झाला असून, त्याला चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या ट्रेलरमध्ये इमरानचा जबरदस्त अॅक्शन अवतार, रोमान्स, हिंसा, विश्वासघात आणि सूडाची कहाणी पाहायला मिळत आहे. ‘अवारापन 2’ नंतर इमरानला पुन्हा एकदा अॅक्शन करताना पाहणे चाहत्यांसाठी खास ठरणार आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य दत्त यांनी केले असून, संगीताची जबाबदारी हिमेश रेशमिया यांनी सांभाळली आहे. चित्रपटात इमरान हाश्मीसोबत जेनेलिया देशमुख, अपारशक्ती खुराना आणि अभिषेक सिंह हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.
ट्रेलरमध्ये अॅक्शन आणि हिंसेचा थरार
‘गनमास्टर G9’च्या ट्रेलरमध्ये इमरान हाश्मी जबरदस्त अॅक्शन करताना दिसत आहे. एका दृश्यात तो काळ्या रंगाच्या एसयूव्ही गाड्यांजवळ शस्त्रांनी सज्ज असलेल्या लोकांच्या टोळीकडे निर्भयपणे जाताना दिसतो. समोर अनेक विरोधक असूनही तो मागे हटत नाही. तर दुसऱ्या दृश्यात अंधाऱ्या खोलीत रक्ताने माखलेल्या एका व्यक्तीचे केस पकडल्याचे पाहायला मिळते. या दृश्यांमधून चित्रपटातील हिंसक आणि थरारक प्रसंगांची झलक मिळते.
चित्रपटाची कथा तुटलेली नाती, प्रेम, विश्वासघात आणि सूड याभोवती फिरताना दिसते. इमरान एका अशा व्यक्तीची भूमिका साकारत आहे, जो आपल्या माणसांसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो. त्यामुळे या चित्रपटात अॅक्शनसोबतच भावनिक प्रसंगांचीही मेजवानी मिळणार आहे.
इमरानच्या दमदार डायलॉगने वेधले लक्ष
ट्रेलरमधील इमरान हाश्मीच्या संवादांनीही चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. सुरुवातीच्या एका दृश्यात त्याचे पात्र प्रेम आणि श्रद्धेबद्दल बोलताना दिसते. ‘एका पुजाऱ्याकडे त्याचा टिळा आहे, एका मुस्लिम भावाकडे त्याचा ईमान आहे आणि आमच्याकडे आमचे प्रेम आहे,’ अशा आशयाचा संवाद ऐकायला मिळतो.
याशिवाय जेनेलिया देशमुखसोबतच्या एका दृश्यात इमरानचा प्रेमळ आणि भावनिक अंदाज पाहायला मिळतो. ‘कदाचित मी तुला हसवू शकणार नाही, पण तुला रडवण्याची परवानगी मी कधीच कोणाला देणार नाही,’ हा त्याचा संवाद विशेष लक्षवेधी ठरत आहे. त्यामुळे चित्रपटात अॅक्शनसोबत इमरान आणि जेनेलियाची रोमँटिक केमिस्ट्रीही पाहायला मिळणार आहे.
