‘तू आई कधी होणार?’, दीपिका म्हणते…

'तू आई कधी होणार?', दीपिका म्हणते...

मुंबई : बॉलिवूडमध्ये नेहमी चर्चेत असणारं नवविवाहित जोडपं म्हणजे अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग. गेल्या वर्षाअखेरीस हे दोघे इटलीमध्ये विवाहबंधनात अडकले. लग्न झाल्यापासूनच दीपिकाला ‘तू आई कधी होणार?’, हा प्रश्न विचारला जातो आहे. त्यावर दीपिकाने अखेर मौन सोडलं आहे. ‘जेव्हा व्हायचं आहे, तेव्हा होईल’, असं दीपिकाने एका मुलाखतीदरम्यान सांगितलं.

डीएनए दैनिकाच्या वृत्तानुसार, आई कधी होणार? या प्रश्नावर मौन सोडत दीपिका म्हणाली, “मी ऐकलं आहे की, जगात आई होणं, यासारखं दुसरं सुख नाही. ते कधी ना कधी होणारच आहे. पण, मला असं वाटतं की, लग्नानंतर महिलेवर आई होण्यासाठी दबाव टाकायला नको. तू आई कधी होणार? हा प्रश्न विचारणं आता बंद करायला हवं. ज्यादिवशी आपण हा प्रश्न विचारणं थांबवू, तेव्हाच समाजात बदल घडवू शकू.”

दीपिका सध्या तिच्या ‘छपाक’ या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. काही दिवसांपूर्वीच दीपिकाने ‘छपाक’ या सिनेमाचं पोस्टर इन्स्टाग्रामवर शेअर केलं होतं. या पोस्टरने सर्वजण आश्चर्यचकीत झाले होते. तिच्या चाहत्यांनी सिनेमाच्या पोस्टरवरुनच हा सिनेमा सुपरहिट ठरणार, असं मत दिलं.

‘छपाक’ हा सिनेमा अॅसिड पीडित लक्ष्मी अग्रवालच्या जीवनावर आधारित आहे. यामध्ये दीपिकाने लक्ष्मी अग्रवालची भूमिका साकारली आहे. चित्रपटात विक्रांत मैसी लक्ष्मीच्या पतीची भूमिका साकारत आहे. या सिनेमात दीपिका पादुकोणच्या भूमिकेचं नाव मालती आहे. हा सिनेमा पुढीलवर्षी 10 जानेवारीला प्रदर्शित होईल. या सिनेमाचं दिग्दर्शन मेघना गुलजार करत आहेत

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI