
जेव्हा कथा, दिग्दर्शन, कलाकारांचं दमदार अभिनय, गाणी, कास्टिंग.. या सर्व गोष्टी जुळून येतात, तेव्हा तो चित्रपट ब्लॉकबस्टर ठरल्याशिवाय राहत नाही. आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर: द रिव्हेंज’ हे दोन्ही चित्रपट या गोष्टीची उत्तम उदाहरणं आहेत. यामध्ये मुख्य भूमिकेत रणवीर सिंहसारखा प्रतिभावान कलाकार आणि त्याच्यासोबत राकेश बेदी, संजय दत्त, अक्षय खन्ना, आर. माधनव, अर्जुन रामपाल, सारा अर्जुन अशा कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय चित्रपटातील इतर कलाकारांचीही सोशल मीडियावर चर्चा होत असून त्यापैकीच एक आहे अभिनेता गौरव गेरा. ‘धुरंधर’च्या दोन्ही चित्रपटांमध्ये त्याने दमदार काम केलं आहे. या चित्रपटाशी संबंधित प्रत्येक अभिनेता त्याच्या भूमिकेत इतका परफेक्ट दिसतोय की, या भूमिका त्यांच्यासाठी लिहिल्या गेल्यासारखं वाटतं.
चित्रपटाच्या कास्टिंगचं श्रेय कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबडाला जातं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मुकेशने चित्रपटाच्या कास्टविषयी मोकळेपणे काही गोष्टी सांगितल्या आहेत. त्याने सांगितलं की त्याची सर्वांत आश्चर्यकारक निवड ही शेवटी सर्वांत परिणामकारक ठरली होती. ‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत मुकेशने सांगितलं की, सध्याच्या घडीला इतकी मोठी कास्ट एकत्र जमवणं हे काही सोपं काम नाही.
“आजकाल एकाच वेळी अनेक कलाकारांना एकत्र आणणं, त्यांना भूमिकेसाठी तयार करणं खूप कठीण असतं. अक्षय खन्ना, संजय दत्त, अर्जुन रामपाल यांचं चित्रपटात एकत्र येणं खूप आनंदाची गोष्ट होती. निवड प्रक्रिया इथूनच सुरू झाली होती. सर्वांत आधी आम्ही मोठ्या कलाकारांना लॉक केलं आणि त्यानंतर इतरांकडे वळलो. आर. माधवनने लगेच होकार दिला होता. ती माझी सर्वांत आवडती कास्टिंग होती. पहिल्याच दिवशी फक्त दोन तासांत आम्ही त्याला लॉक केलं होतं. त्यानंतर राकेश बेदी आणि इतरांचा समावेश झाला. आम्ही मोठ्या नावांपासून सुरूवात करून नंतर स्टेप-बाय-स्टेब, सीन-बाय-सीन पुढे गेलो. धुरंधरच्या दोन्ही भागांच्या संपूर्ण कास्टिंगला मला जवळपास दीड वर्षांचा कालावधी लागला होता”, असं त्याने सांगितलं.
गौरव गेराच्या निवडीबद्दल मुकेश म्हणाला, “आपल्या विनोदी अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या गौरव गेराला या चित्रपटात पाहून सर्वजण चकीत झाले होते. मी जेव्हा स्क्रीप्ट वाचतो, तेव्हा नेहमी हाच विचार करतो की टिपिकल कास्टिंग न करता वेगळं काही कसं करता येईल? गौरवने बऱ्याच विनोदी भूमिका साकारल्या होत्या, त्यामुळे लोकांना त्याच्या अभिनयाची अशी बाजू पहायला मिळाली नव्हती. जर आम्ही अशा एका अभिनेत्याला घेतलं असतं, जो गंभीर भूमिका करतो, मग लोकांना आश्चर्य वाटलं नसतं. मी त्याचं बरंच काम पाहिलं होतं. त्यावेळी तो मुंबई सोडून गुरुग्रामला राहायला गेला होता. मी त्याला फोन करून सांगितलं की काही दिवस दाढी वाढव. मला काही लूक टेस्ट करायचे आहेत. मला लोकांना सरप्राइज द्यायचं होतं. जेव्हा त्याने लूक टेस्ट दिला, तेव्हा आदित्य धरसुद्धा त्याला ओळखू शकला नव्हता.”